Bride who Wants Husband With Govt Job Rejects Groom Earning Rs 120,000 Per Month : आपल्याकडे खासगी नोकरीत तुम्हाला कितीही जास्त पगार असेल तरीही सरकारी नोकरीला खूप जास्त महत्व दिले जाते. समाजात सरकारी नोकरी ही एक प्रतिष्ठेची बाब मानली जाते. लग्न जुळवली जात असतानादेखील ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे अशा तरूणांना गरजेपेक्षा जास्त महत्व दिले जाते. यासंबंधी अनेक घटना वेळोवेळी समोर येत असतात. पण लग्नाचे विधी सुरू असताना एका तरूणीने मुलगा सरकारी नोकरी करत नसल्याने लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

लग्न ठरलं, सगळ्या विधी पार पडल्या… वरमाला सोहळा देखील पार पडला… इतकं सगळं होऊनही लग्न मोडलं. हे लग्न मोडण्यामागचं कारण ऐकून अनेकांना धक्का बसेल. मिडिया रिपोर्टनुसार, नवरीने फक्त नवरदेव असलेल्या मुलाला सरकारी नोकरी नाही म्हणून लग्न मोडले आहे. मुलगा सरकारी नोकरी करतो असे वाटल्याने तिने लग्नाला होकार दिला होता असं त्या मुलीचं म्हणणं आहे. तिला ऐनवेळी नवरदेव एका खाजगी कंपनीत नोकरी करतो हे समजलं आणि त्यानंतर मुलीने लग्नाच्या उरलेल्या विधी पूर्ण करण्यास नकार दिला. हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबाद जिल्ह्यात घडला. जिथे मुलीने लग्नाला नकार दिल्यानंतर वराती मंडळी रिकाम्या हाताने परत गेली.

नेमकं झालं काय?

नवरा मुलगा अभियंता पदावर एका खासगी कंपनीत काम करतो आणि महिन्याला १ लाख २० हजार रुपये कमावतो. इतकेच नाही तर बलरामपूर छत्तीसगड येथील या तरुणाकडे सहा फ्लॅट आणि २० एकर जमीन देखील आहे. इतकं सगळं असूनदेखील फक्त त्याच्याकडे सरकारी नोकरी नाही हे कारण देत मुलीने लग्न अर्ध्यात मोडलं आहे.

हेही वाचा>> D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले; म्हणाले, “एखादा पक्ष किंवा व्यक्ती…”

सरकारी नोकरदारच पाहिजे

लग्न सोहळ्याच्या रात्री वरात लग्नघरी पोहचली. येथे बाकीचे वरमाला आणि इतर विधी रात्री उशीरा पूर्ण करण्यात आले. पण मध्यरात्रीच्या सुमारास नवरीला कुठून तरी नवरदेवाला सरकारी नोकरी नाही हे समजलं. त्यानंतर तिने लग्नाच्या पुढील विधी करण्यास नकार दिला. त्या तरूणीची दोन्ही कुटुंबियांनी समजूत काढण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण ती लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. त्या तरूणीची समजूत घालण्यासाठी नवरदेवाने फोनवरून सॅलरी स्लीप देखील मागवून घेत तिला दाखवली. ज्यामध्ये मुलाला दर महिना १ लाख २० हजार रुपये पगार असल्याचे नमूद होते. तरीही तिने मुलगा सरकारी नोकरदारच हवा ही मागणी सोडली नाही.