Shocking News From Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. लग्नाच्या काही तास आधीच वधूचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पण पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी चौकशी केल्याने धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

२६ वर्षीय होमिओपॅथी डॉक्टर असलेल्या एका मुलीचं लग्न मंगळवारी, १८ फेब्रुवारी रोजी होतं. लग्नाकरता ती मेकअप करायला ब्युटी पार्लरमध्ये गेली. पण बराच वेळ झाला तरी ती परतली नाही म्हणून तिच्या पालकांनी तिचा शोध घेतला. तर, दुसरीकडे लग्नमंडपात पाहुणे मंडळी ताटकळत वधुची वाट पाहत होते. त्यामुळे आई वडिलांनी पाहुण्यांना वधूचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. पार्लरमध्येच वधूला हृदयविकाराचा झटका आला आणि मेरठच्या रुग्णालयात घेऊन जात असताना तिचा मृत्यू झाला, असं आई वडिलांनी पाहुणे मंडळींना सांगितलं. त्यामुळे ‘लग्नाच्या काही तास आधीच वधूचा मृत्यू’ अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनेक माध्यमांनीही याची दखल घेत ही बातमी प्रसिद्ध केली. त्यानुसार, पोलिसांपर्यंतही बातमी पोहचली.

पण पोलिसांना या घटनेत काहीतरी संशय आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ या कुटुंबाची चौकशी करायचं ठरवलं. वधूच्या वडिलांची चौकशी केली असता पोलिसांना योग्य उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी थेट ब्युटी पार्लर गाठलं. ब्युटी पार्लरमधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती समजली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा वडिलांकडे चौकशी केली.

नेमकं काय घडलं होतं?

ब्युटी पार्लरमधून ही वधू तिच्या एका मैत्रिणीबरोबर बाहेर पडताना दिसली. बाहेर पडून ती एका कारमधून निघून गेली. त्यामुळे वडिलांनी तिच्या मैत्रिणीवर अपहरणाचा दावा केला. त्यानुसार, वधूच्या वडिलांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली, अशी माहिती मंडीच्या पोलीस उपअधीक्षक रुपाली राव यांनी सांगितलं.

“आम्ही टोल प्लाझावरून आणि अनेक ठिकाणांहून सीसीटीव्ही फुटेजवरून माहिती गोळा केली. आम्ही त्यांच्या मोबाईल नंबरवरूनही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आम्हाला असं आढळलं की या दोघी ग्वाल्हेरमध्ये आहेत”, असं राव पुढे म्हणाल्या.

मुलीचा लग्नाला विरोध म्हणून मुलीबरोबर पळाली

मध्य प्रदेशातील पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी बुधवारी सकाळी ग्वाल्हेरमधील एका हॉटेलमध्ये या दोन्ही महिलांचा शोध घेतला. हॉटेलमध्ये या दोघी सापडल्यानंतर त्यांना मुझफ्फरनगरला आणण्यात आले. जिथे त्यांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले. ती लग्नाला तयार नव्हती. तिच्या कुटुंबियांकडून तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यात आला होता. तसंच तिच्या कुटुंबासह मुझफ्फरनगर येथे वराच्या मूळ गावी जाण्यासही भाग पाडण्यात आल्याची माहिती, या संबंधित वधूने दिली, असं तपास अधिकारी उपनिरिक्षक तपन जयंत म्हणाले.

तर, वधू म्हणाली, “मी माझ्या मैत्रिणीबरोबर पळून जाण्याची योजना आखली. ती झाशीची रहिवासी आहे. ती तिच्या स्वतःच्या मर्जीने इथे आली होती.” यानंतर संबंधित वधू आता तिच्या कुटुंबियांसोबत घरी गेली असून तिच्या मैत्रिणीलाही सोडून देण्यात आलं आहे.

Story img Loader