भारतीय कुस्ती महासंघाच्या (रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया – WFI) अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय सिंह यांनी ही निवडणूक जिंकली आहे. या निकालामुळे ज्या कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप करत आंदोलन केलं होतं त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. संजय सिंह अध्यक्ष होताच ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याने पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. तर ऑलिम्पिक पदकविजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीला कायमचा रामराम केला आहे. यावर बृजभूषण शरण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बृजभूषण शरण सिंह म्हणाले, ते नाराज आहेत तर यामध्ये आम्ही त्यांची काय मदत करू शकतो? हा त्यांच्या वैयक्तिक निर्णय (कुस्ती बंद करणे, पद्मश्री परत करणे) आहे. जे लोक गेल्या १२ महिन्यांपासून मला केवळ शिव्या देण्याचं काम करत आहेत. आजही शिव्याच देत आहेत, त्यांची मी काय मदत करणार. मुळात त्यांना शिवी देण्याचा अधिकार कोणी दिला? आज ते निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित करत आहेत. सरकारबाबत प्रश्न निर्माण करत आहेत. आज ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत त्यामुळे हे सगळं करत आहेत. आज देशातला कोणताही कुस्तीपटू त्यांच्याबरोबर नाही. त्यामुळे या कुस्तीपटूंची मी काय मदत करणार? मी स्वतःला फासावर लटकवू का?
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी (२१ डिसेंबर) निवडणूक पार पडली. बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी या निवडणुकीत माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला. एकूण ४७ जणांनी या निवडणुकीत मतदान केलं होतं. यापैकी ४० मतं संजय सिंह यांना तर अनिता यांना केवळ सात मतं मिळाली.
हे ही वाचा >> VIDEO : बजरंग पुनियाने फूटपाथवर ठेवला ‘पद्मश्री’, मोदींना भेटू न दिल्याने पंतप्रधानांच्या घराबाहेर ठेवलं पदक
अनेक कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. तसेच बृजभूषण यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी दिल्लीत अनेक ठिकाणी आंदोलनही केलं होतं. त्या आंदोलनानंतरही बृजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यातच कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण यांचे कट्टर समर्थक असलेले संजय सिंह विजयी झाले आहेत. निवडणुकीच्या या निकालामुळे सर्व आंदोलक कुस्तीपटू निराश झाले आहेत.