भाजपा खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात त्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या सर्वसाधारण जामिनावर २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सहा महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी कुस्तीपटूंनी अनेक दिवस दिल्लीत आंदोलन केलं. मोठ्या लढाईनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात राऊज अवेन्यू कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आता कोर्टाने ब्रिजभूषण यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आता बुधवारी त्यांच्या सर्वसाधारण जामिनावर सुनावणी होईल. त्यांना २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर २ दिवसांचा जामीन मिळाला आहे. यासह कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांचा जामीनही मंजूर करण्यात आला आहे. २० जुलै रोजी त्यांच्या नियमित जामिनावर सुनावणी होईल. यावर निकाल येईपर्यंत ब्रिजभूषण सिंह अंतरिम जामिनावर असतील.
कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांच्याविरोधातही दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, विनोद तोमर हे ब्रिजभूषण सिंह यांना सर्व प्रकारची मदत करत होते. एखादी महिला कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंह यांना भेटायला गेली असेल तर ती तिथे एकटीच असेल याची काळजी विनोद तोमर घेत होते. ब्रिजभूषण आणि कुस्तीपटूंची एकांतात भेट होईल याची काळजी तोमर घेत होते.
हे ही वाचा >> मानहानी खटला प्रकरणात राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात याचिका, २१ जुलैला सुनावणी
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, तक्रारदार महिला कुस्तीपटू या वेगवेगळ्या वेळी दिल्लीतल्या ब्रिजभूषण सिंह यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्यांच्याबरोबर कोणीही असलं तरी विनोद तोमर तिथे केवळ महिला कुस्तीपटू आणि ब्रिजभूषण यांची भेट घडवून आणत होते. तोमर यांनी या कुस्तीपटूंचे पती आणि प्रशिक्षकांना ब्रिजभूषण यांच्या कार्यालयापासून लांब बसवलं होतं. तर दुसऱ्या बाजूला ब्रिजभूषण यांनी त्यांच्या कार्यालयात या महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार कुस्तीपटूंनी केली आहे.