बलुचिस्तानमधील नेते अकबर बुग्ती यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश क्वेट्टामधील न्यायालयाने दिले. सुरक्षेच्या कारणांवरून मुशर्रफ यांना या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात आणता येणार नाही, हा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला.
पोलिसांनी क्वेट्टामधील दहशतवादविरोधी न्यायालयामध्ये मुशर्रफ यांच्याविरुद्ध आरोपपत्र सोमवारी दाखल केले. त्यावेळीच सुरक्षेच्या कारणांमुळे मुशर्रफ यांना न्यायालयात आणता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. न्या. मुहम्मद इस्माईल बलूच यांनी पोलिसांनी सादर केलेले आरोपपत्र दाखल करून घेतले. मात्र, मुशर्रफ यांना आणता येणार नसल्याचे पोलिसांचे निवेदन फेटाळले. याप्रकरणी येत्या ३० जुलैला होणाऱया पुढील सुनावणीवेळी मुशर्रफ यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले.