पीटीआय, लंडन

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे यासाठी ब्रिटननेही पाठिंबा दिला आहे. अमेरिका, फ्रान्स या देशांनी यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. भारताला सदस्यत्व मिळाल्यास ही अधिक प्रातिनिधिक संस्था बनेल, असे ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सांगितले.

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील आपल्या भाषणात स्टार्मर म्हणाले, जागतिक बहुपक्षीय प्रणाली अधिक प्रातिनिधिक आणि अधिक प्रतिसाद देणारी असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी सुधारणा महत्त्वाच्या आहेत.भारत, आफ्रिका, ब्राझील, जपान आणि जर्मनी या देशांना कायमस्वरूपी प्रतिनिधित्व देण्याबरोबरच ब्रिटनने सुरक्षा परिषदेच्या निवडून आलेल्या सदस्यांसाठी अधिक जागांची मागणी केली.

हेही वाचा >>>Election Commission : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचं महाराष्ट्राला पत्र; ‘या’ विषयावर व्यक्त केली नाराजी!

पाकिस्तानी पंतप्रधानांकडून काश्मीरचा मुद्दा उपस्थित

पाकिस्तानने शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. काश्मीरमध्यील टिकाऊ शांतात सुरक्षित करण्यासाठी भारताने अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा आणि काश्मीरप्रश्नी संवाद साधला पाहिजे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले. पॅलेस्टाईनच्या नागरिकांप्रमाणे जम्मू-काश्मीरच्या जनतेनेही त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि आत्मनिर्णयाच्या अधिकारासाठी शतकानुशतके संघर्ष केला आहे, असे शरीफ म्हणाले. शांततेकडे वाटचाल करण्याऐवजी जम्मू-काश्मीरबाबत सुरक्षा परिषदेच्या ठरावांची अंमलबजावणी करण्याच्या आपल्या वचनबद्धतेपासून भारत दूर गेला आहे, असा आरोप शरीफ यांनी केला.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस आणि ‘यूएन’च्या सर्वसाधारण सभेचे नवे अध्यक्ष फिलेमॉन यांग यांची भेट घेतली. पश्चिम आशिया, युक्रेन आदी विषयांवर त्यांच्यात चर्चा झाल्या. यांग यांच्या ‘विविधतेत एकता’, ‘शांतता’ आणि ‘शाश्वत मानवता’ या मुद्द्यांना जयशंकर यांनी पाठिंबा दिला.

Story img Loader