लंडन : ब्रिटनमधील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसह परदेशी विद्यार्थ्यांमुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर बंधने आणण्यासंबंधी चर्चा सुरू असतानाच हा महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे.
पार्टनर अॅट लंडन इकॉनॉमिक्स या संस्थेने केलेल्या विश्लेषणामध्ये ही महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. ब्रिटनमध्ये परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर निर्बंध आणण्याच्या आणि अभ्यासानंतर नोकरी करण्याच्या व्हिसा अधिकारांमध्ये कपात करण्याच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पार्टनर अॅट लंडन इकॉनॉमिक्स या संस्थेने द हायर एज्युकेशन पॉलिसी इन्स्टिटय़ूट, युनिव्हर्सिटीज यूके इंटरनॅशनल आणि काप्लन इंटरनॅशनल पाथवेज या शैक्षणिक संस्थांसाठी हे विश्लेषण केले.
या विश्लेषणासाठी २०२०-२१ ची आकडेवारी विचारात घेण्यात आली आहे. युरोपीय महासंघाबाहेरून आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमागे ब्रिटनला ९६ हजार पौंडाचा फायदा झाला आहे. परदेशी विद्यार्थ्यांमुळे विद्यापीठांना जागतिक दर्जाचे अध्यापन आणि संशोधन करणे शक्य होते, जे एरवी शक्य झाले नसते. या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यात या विद्यापीठांना आलेल्या यशाची प्रशंसा केली पाहिजे असे पार्टनर अॅट लंडन इकॉनॉमिक्सचे डॉ. गेवन कॉनन म्हणाले. यासंबंधी नियमांमध्ये बदल करायाचे असतील तर पुराव्यांवर आधारित करावेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
परदेशी विद्यार्थ्यांवर जितका खर्च होतो त्याच्या दहा पट त्यांच्याकडून ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. याचा फायदा स्थानिक आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला होतो.
– डॉ. गेवन कॉनन, पार्टनर अॅट लंडन इकॉनॉमिक्स