ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले, तेव्हा त्याची भारतात जोरदार चर्चा झाली. ते भारतीय वंशाचे असल्याची तर झालीच, पण त्याहून जास्त ते भारताचे जावई असल्याची झाली. इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांचे ते जावई. तेव्हापासून ऋषी सुनक कधी त्यांच्या निर्णयांमुळे, जाहीर भूमिकांमुळे किंवा भारतासंदर्भात केलेल्या सकारात्मक वक्तव्यामुळे चर्चेत राहिले. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले असून त्यांचा एक बुलेटप्रूफ जॅकेट घातलेला फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो स्वत: ऋषी सुनक यांनीच ट्वीट केला असून त्यासंदर्भात माहितीही दिली आहे.
नेमकं घडलं काय?
ऋषी सुनक यांचा बुलेटप्रूफ जॅकेट घातलेला आणि स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा करतानाचा एक फोटो गेल्या आठवड्यात व्हायरल झाला. या फोटोची बरीच चर्चाही झाली. ब्रिटिश सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कोणत्या ऑपरेशनमध्ये थेट ब्रिटनचे पंतप्रधान सहभागी झाले होते? अशाही चर्चा सुरू झाल्या. यावर ऋषी सुनक यांनी केलेल्या ट्वीटनंतर खुलासा झाला. ब्रिटनमध्ये बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या स्थलांतरितांविरोधात ब्रिटिश सरकारने कठोर मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून ऋषी सुनक त्यात सहभागी झाले होते.
ऋषी सुनक यांचा ‘डे ऑफ अॅक्शन’मध्ये सहभाग!
ब्रिटनमध्ये बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून गेल्या आठवड्यात बुधवारी ‘डे ऑफ अॅक्शन’ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत नॉर्थ लंडनमधील कारवाईत स्वत: ऋषी सुनक सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी बुलेटप्रूफ जॅकेटही परिधान केले होते.
“मी ब्रिटनमधील अवैध कामगारांना बाहेर काढण्याच्या ब्रिटिश प्रशासनाच्या मोहिमेत सहभागी झालो. यातून आम्हाला हा संदेश द्यायचा होता की इथे कोण येईल हे कुठल्या गुन्हेगारांच्या टोळ्या ठरवणार नाहीत, तर आम्ही ठरवू. मी बेकायदा स्थलांतरितांच्या अडचणीवर मात करण्याच्या दिलेल्या आश्वासनाचाच हा भाग आहे”, असं ऋषी सुनक यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
१०५ स्थलांतरितांना अटक!
या कारवाईत ब्रिटिश प्रशासनाने आत्तापर्यंत १५९ ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत एकूण १०५ बेकायदा विदेशी स्थलांतरितांना अटक करण्यात आली आहे. हे स्थलांतरित जवळपास २० वेगवेगळ्या देशांमधून ब्रिटनमध्ये आले होते.