ब्रिटनमध्ये सध्या इतर देशांमधून आश्रयासाठी येणाऱ्या नागरिकांचं प्रमाण वाढू लागलं आहे. यामुळे स्थानिक हॉटेल्स आणि इतर सुविधांवर ताण निर्माण होत असल्याचं दिसू लागलं आहे. यासंदर्भात ब्रिटन सरकारने बेकायदेशीर स्थलांतरितांमुळे स्थानिक सुविधांवर निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. या उपाययोजना फलदायी ठरत असल्याचं सांगतानाच त्याबाबत तक्रार करणाऱ्या स्थलांतरीतांची ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी चांगलीच कानउघाडणी केली आहे.
नेमका काय आहे प्रकार?
ब्रिटनं जगातील कठीण परिस्थिती असणाऱ्या देशातील नागरिकांसाठी राजाश्र्य धोरण जाहीर केलं होतं. त्यानुसार, या देशांमधून स्थलांतरितांना ब्रिटनमध्ये आश्रय देण्याची भूमिका घेण्यात आली होती. मात्र, यात अनेक बेकायदेशीर स्थलांतरीतही ब्रिटनमध्ये येत असून त्यामुळे ब्रिटनमधील हॉटेल्स आणि इतर सोयी-सुविधांवर ताण निर्माण होऊ लागला. त्यामुळे स्थानिक पातळीवर नाराजीही व्यक्त होताना पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर ऋषी सुनक सरकारने काही उपाययोजना जाहीर केल्या. या उपाययोजना आता फलदायी ठरत असल्याचं सुनक यांनी म्हटलं आहे.
बेकायदेशीर स्थलांतरितांची बोटवर व्यवस्था!
केंटमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऋषी सुनक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी तु्म्हाला वचन देतो, की आपण स्थानिक हॉटेल्समधून बेकायदेशीर स्थलांतरितांना हटवून त्यांची दुसरीकडे सोय करू. स्थानिक सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी आपण या लोकांना थेट बोटीवरच हलवू. येत्या १५ दिवसांत त्यातलं पहिलं जहाज पोर्टलँडमध्ये दाखल होईल. अजून दोन जहाजांची व्यवस्था करण्यात आली असून त्यावर १ हजार जणांची व्यवस्था होऊ शकेल”, असं सुनक म्हणाले आहेत.
काही ठिकाणी हॉटेलमध्ये आहे त्या खोल्यांमध्ये एकाहून अधिक स्थलांतरितांना सामावून घेण्याचेही निर्देश सुनक यांनी दिले आहेत.
स्थलांतरितांकडून निषेध!
दरम्यान, सुनक सरकारच्या या धोरणाचा स्थलांतरितांनी काही ठिकाणी निषेधही केल्याचं समोर आलं आहे. यावरून ऋषी सुनक यांनी स्थलांतरितांना सुनावलं आहे. “शक्य तिथे एका खोलीत अधिक स्थलांतरितांना सामावून घेण्यास सांगितल्यामुळे आपण अशा अतिरिक्त ११ हजार ५०० जागा तयार करू शकलो आहोत. ज्या स्थलांतरितांनी यावर आक्षेप घेतलाय, त्यांना मी सांगेन की ही पूर्णपणे न्याय्य प्रक्रिया आहे. तुम्ही मृत्यूच्या, छळाच्या आणि देहदंडाच्या भीतीने इथे येत असाल तर तुम्ही ब्रिटिश करदात्यांच्या पैशांवर चालणाऱ्या लंडनमधील हॉटेल्समधल्या खोल्यांमध्ये तडजोड करण्याची तयारीही असायला हवी”, असं ते म्हणाले.