Britain PM Rishi Sunak: ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान झाल्यानंतर भारतभरातून या घटनेचं स्वागत करत आनंद व्यक्त केला जात आहे. दीडशे वर्ष ज्या ब्रिटननं भारतावर राज्य केलं, आता त्याच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाची व्यक्ती बसल्याच्या प्रतिक्रियाही नेटिझन्सकडून व्यक्त करण्यात येत आहेत. मात्र, दुसरीकडे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान असल्यामुळे भारतीयांना त्या गोष्टीचा इतका आनंद होण्याचं कारण काय? अशाही प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी प्रवेश केला असून यावेळी त्यांनी हातात पवित्र गंडा बांधल्याचं दिसल्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पवित्र धागा हाती बांधून सुनक यांचा गृहप्रवेश!
ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आज पंतप्रधान निवासस्थानी प्रवेश केला. यावेळी त्यांनी हातात लाल रंगाचा पवित्र धागा बांधल्याचं दिसून आलं. नेटिझन्सकडून त्यांच्या या कृतीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. भारतीय प्रथा-परंपरेनुसार सर्व पूजाविधींमध्ये आणि कोणत्याही नवीन कामाच्या शुभारंभासाठी हा धागा पवित्र मानला जातो. या धाग्याला काही ठिकाणी ‘मौली’ किंवा ‘कलावा’ असंही म्हटलं जातं. पंतप्रधानांचं शासकीय निवासस्थान असलेल्या १०, डाऊनिंग स्ट्रीटच्या बाहेर ऋषी सुनक उपस्थितांना अभिवादन करत असताना त्यांच्या हातात हा धागा बांधला असल्याचं दिसून आलं.
ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांना पदावरून पायउतार व्हावं लागल्यानंतर ऋषी सुनक यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर सुनक यांच्या नावे अनोखा इतिहास नोंद झाला आहे. ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश पंतप्रधान ठरले आहेत. शिवाय, गौरवर्णीय नसणारेही ते पहिलेच ब्रिटिश पंतप्रधान आहेत. त्याशिवाय, गेल्या २०० वर्षांमध्ये ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बसणारे ते सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत. ४२व्या वर्षीच पंतप्रधानपदी बसण्याचा मान त्यांना मिळाला आहे. ब्रिटनच्या सम्राज्ञी एलिझाबेथ द्वितीय यांचं नुकतंच निधन झाल्यामुळे ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांच्याकडून पंतप्रधानपदाची शपथ घेणारेही ते पहिलेच पंतप्रधान आहेत.