ब्रिटन सरकारने सोमवारी इंधन तुटवड्याच्या व्यवस्थापनासाठी थेट लष्कराची मदत घेण्याचा विचार सुरु असल्याचं स्पष्ट केलं आहे. सध्या ब्रिटनमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी टँकर चालवणारे चालक उपलब्ध नाहीयत. त्यामुळेच इंधन कमी पडू नये या भितीने अनेकांनी इंधन मिळतं त्या गॅस स्टेशन्स म्हणजेच पेट्रोल पंपांबाहेर गाड्यांमध्ये इंधन भरण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या आहेत. याच कारणाने अनेक भागांमधील फ्युएल स्टेशन्सवरील इंधन संपलं आहे.

“इंधनाचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी लष्करामधील काही टँकर चालकांची मदत घेण्यासंदर्भातील सर्व तयारी करण्यात आलीय. इंधन पुरवठ्याची साखळी सुरक्षित करण्यासाठी मदत लागल्यास या चालकांची नियुक्ती केली जाईल,” असं ब्रिटनच्या उद्योग, ऊर्जा आणि औद्योगिक नियोजन विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

संपूर्ण ब्रिटन देशामध्ये अनेक ठिकाणी लोकांनी आपल्या गाड्यांमधील इंधनाची टाकी पूर्ण भरुन घेण्यासाठी पेट्रोल पंपांबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणाच्या इंधन केंद्रांवरील इंधन संपलं असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. याच गोंधळामुळे सध्या ब्रिटन सरकारने करोना कालावधी लक्षात घेत आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाऱ्या गाड्यांना प्राधान्यक्रम देण्याचा निर्णय़ घेतला आहे. इंधन पुरवठा करणारे टँकर चालकांचा तुटवडा आणि अचानक वाढलेली मागणी यामुळे हे संकट ओढावल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

ब्रिटीश लष्कराच्या चालकांना नियुक्त करण्याआधी विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये हा गोंधळ कमी झाला नाही तर या चालकांची नियुक्ती केली जाईल असं ब्रिटन सरकारचं म्हणणं आहे. “पुढील काही दिवसांमध्ये मागणी पुन्हा पूर्वव्रत होईल असा अंदाज इंधन क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. तरीही आम्ही विचारपूर्वक पद्धतीने हा निर्णय घेत आहोत,” असं उद्योग विभागाचे सचिव कावसी क्वार्तेंग यांनी म्हटलं आहे. गरज पडल्यास मागणी आणि पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त लष्करी जवान नियुक्त करुन टँकर्सच्या माध्यमातून पुरवठा केली जाईल असंही ते म्हणाले.

ब्रिटनने या संकटावर मात करण्यासाठी टँकर चालकांना तात्पुरत्या स्वरुपाचा व्हिजा तातडीने देण्याचा निर्णयही घेतलाय. शेल, बीपी आणि ईसोसारख्या इंधन पुरवठादार कंपन्यांनी आमच्याकडे इंधनाचा मुबलक साठा आहे असं म्हटलंय. पुढील काही दिवसांमध्ये मागणी सामान्य होईल असंही या कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे. लोकांनी घाबरुन न जाता सामान्य पद्धीतने इंधन विकत घ्यावे, असं आवाहन या कंपन्यांनी केलं आहे.