गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनच्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे पुन्हा एकदा युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. या सगळ्या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्यावरून युक्रेनमधील परस्थिती दिवसेंदिवस बदलू लागली आहे. नाटोच्या फौजा युक्रेनपर्यंत आल्यानंतर रशियानं आक्रमक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. युक्रेनच्या सीमारेषेवर रशियन सैन्य मोठ्या संख्येने जमू लागलं आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला असून त्यात आता ब्रिटननं रशियाविरुद्ध मोठं पाऊल उचललं आहे.
रशियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लागणार!
रशियाच्या आक्रमक धोरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून त्यासंदर्भात आता ब्रिटन सरकारनं महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री लिझ ट्रूस यांनी सोमवारी यासंदर्भात घोषणा केली असून पुढील महिन्यापर्यंत रशियावर लादण्यात येणाऱ्या निर्बंधांचा मसुदा तयार होईल, असं त्यांनी जाहीर केलं आहे. यासंदर्भात ब्रिटिश संसदेमध्ये कायदाच पारीत केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
“पुढील महिन्यात अर्थात १० फेब्रुवारीपर्यंत आमचा यासंदर्भातला कायदा तयार होईल. रशियावर मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लादणं या कायद्यामुळे आम्हाला शक्य होणार आहे. रशियाला आर्थिक किंवा धोरणात्मक पाठबळ देणाऱ्या इतर देशांना देखील हे निर्बंध लागू होतील”, असं लिझ ट्रूस यांनी स्पष्ट केलं आहे. “आता कुठेही लपायला जागा उरणार नाही. आम्ही हे निर्बंध कोणत्याही भितीशिवाय किंवा कुणालाही पाठिशी न घालता लादणार आहोत. या बाबतीत माझ्या मनात अजिबात शंका नाही”, असं देखील ट्रूस यांनी स्पष्ट केलं आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही दिला इशारा
दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनच्या मुद्द्यावरुन रशियाला परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. “जर रशिया चर्चेच्या माध्यमातून आमच्या सुरक्षेसंदर्भातील चिंता दूर करण्यासाठी तयार असेल तर अमेरिका आणि आमचे सहकारी देश याच चर्चेच्या दिशेने पुढे जातील. मात्र रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असं बायडेन म्हणाले आहेत.