शेतकरी आणि अन्य प्राण्यांना इजा होऊ नये म्हणून शिंगांशिवाय गायींचे प्रजनन करण्याचा प्रयत्न ब्रिटनमधील शास्त्रज्ञ करीत आहेत. िशगांशिवाय गाई जन्मास आल्या तर अधिक सुरक्षितता उत्पन्न होईल, असे शास्त्रज्ञांना वाटत आहे.
सन २०१०-११ मध्ये गायींच्या शिंगांमुळे पाच शेतमजूर ठार, तर ९१ मजूर जखमी झाले होते. याखेरीज दोन नागरिक आणि अन्य १७ जण गंभीररीत्या जखमी झाले होते. हा धोका रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी ‘शिंगेविरहित गायीं’च्या प्रयोगास हात घातला आहे.
 शिंगांशिवाय गायींच्या जन्मासाठी त्यांच्यात एक विशिष्ट प्रकारचा डीएनए सोडण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे. या डीएनएमुळे गायींच्या शिंगांची वाढ रोखण्यास मदत होईल, असे शास्त्रज्ञांना वाटते. ही बाब साध्य झाली तर प्राण्यांच्या कल्याणाचे एक आगळेवेगळे पाऊल ठरेल, असे प्रा. जॉफ सीम यांनी सांगितले.
मिनेसोटा विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्रा. स्कॉट फार्हेन्क्रुग यांच्यासमवेत विविध शास्त्रज्ञ या संदर्भात काम करीत असून तेही शिंगेविरहित गायींसाठी संशोधन करीत आहेत.