गोव्यातील आरंबोल समुद्रकिनाऱ्याजवळ एका महिला ब्रिटिश पर्यटकावर स्थानिकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२ जून) घडली आहे. आरोपीने महिलेसोबत आलेल्या एका पुरुष पर्यटकासमोरच हा अत्याचार केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून ३२ वर्षीय आरोपी व्हिन्सेंट डिसोझा याला अटक केले आहे. आरोपी डिसोझाने याआधी ग्रंथपाल म्हणून काम केलेले आहे.
याबाबत एनडीटीव्हीने सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार ब्रिटनमधील एक मध्यमवयीन महिला एका पुरुष साथिदारासोबत पर्यटनासाठी गोव्यामध्ये आली होती. सोमवारी (२ जून) ती आरंबोल समुद्रकिनाऱ्याजवळ आराम करत होती. यावेळी बॉडी मसाज देण्याच्या बहाण्याने आलेल्या आरोपी व्हिन्सेंट डिसोझाने या महिलेवर बलात्कार केला.
हेही वाचा >> सामुहिक बलात्काराने हैदराबाद हादरले; एका पाठोपाठ चार ठिकाणी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
ही घटना घडल्यानंतर पीडित ब्रिटिश महिलेने तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. तसेच पेरनेम पोलीस ठाण्यामध्ये या महिलेने तक्रार दाखल केली असून भारतातील ब्रिटीश दूतावासाकडूनही मदत मागितली आहे. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांत पेरनेम पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केले आहे. तसेच आरोपीचा याआधी गुन्हेगारीचा काही इतिहास आहे का याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.
दरम्यान, आरोपी आणि पीडित महिला या दोघांनाही पणजीजवळ असलेल्या मापुसा येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तसेच या घटनेत भारतीय दंड संहितेच्या ३७६ कमलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपअधीक्षक सुद्धांत शिरोडकर अधिक तपास करत आहेत.