इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई अर्थात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे त्यांच्या सासऱ्यांमुळे अडचणीत आले आहेत. कारण ऋषी सुनक यांच्या विरोधात असलेल्या लेबर पार्टीने हा आरोप केला आहे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती हे सुनक यांचे सासरे आहेत. तसंच सुनक यांच्या पत्नीची इन्फोसिसमध्ये भागिदारी आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये या कंपनीला पंतप्रधान पदाचा प्रभाव वापरत महत्वाची वागणूक देण्यात आली.
नेमका कशाच्या आधारे हा आरोप?
एका मीडिया रिपोर्टचा आधार घेऊन विरोधी पक्षाने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर हा आरोप केला आहे. संडे मिरर या ब्रिटनच्या साप्ताहिक वर्तमानपत्रात फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशनच्या रिक्वेस्ट सेक्शनमध्ये हे लिहिण्यात आलं होतं की वाणिज्य मंत्री लॉर्ड डॉमिनिक जॉनसन गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात बंगळुरुला गेले होते. तिथे त्यांनी इन्फोसिसच्या ऑफिसमध्ये जाऊन एक बैठक केली. या बैठकीत डॉमिनिक यांनी ब्रिटनमध्ये इन्फोसिसचं कामकाज कसं आहे यावर विस्ताराने चर्चा केली. इतकंच नाही तर या बैठकीत जॉनसन यांनी कथितपणे असं म्हटलं होतं की ब्रिटनमध्ये इन्फोसिसचा विस्तार झालेला आम्हाला पाहायचा आहे. त्यासाठी आम्ही इन्फोसिसला शक्य तेवढी सगळी मदत करु असं करण्यात आम्हाला आनंदच होईल.
विरोधी पक्षाकडून आरोपांच्या फैरी
याच वृत्ताचा आधार घेऊन विरोधी पक्षाने कडाडून टीका केली आहे. ऋषी सुनक यांनी त्यांच्या अत्यंत जवळच्या लोकांना इतकी व्हिआयपी ट्रिटमेंट कशी काय दिली? असा प्रश्न विरोधी पक्षाचे नेते जोनाथान एशवर्थ यांनी विचारला आहे. तसंच हा सगळा प्रकार गंभीर असल्याचं म्हटलं आहे. ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या इन्फोसिसमध्ये ०.१९ टक्केच्या भागीदार आहेत. ज्याचं मूल्य जवळपास ५० कोटी रुपये आहे. गेल्या आर्थिक वर्षात या भागिदारीचा लाभांश अक्षता मूर्ती यांना मिळाला होता.
हे पण वाचा- इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा ३६ तासांचा उपवास; यामुळे वजन होतं झटपट कमी? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या…
ब्रिटिश वृत्तपत्रात वाणिज्य मंत्री लॉर्ड डॉमिनिक जॉनसन यांची इन्फोसिसबरोबर जी बैठक झाली त्याचा संदर्भ देण्यात आला आहे. आमच्या देशाच्या व्यापार विभागाकडून आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करु असं आश्वासन इन्फोसिसला जॉनसन यांनी दिलं होतं असाही उल्लेख त्या वृत्तात आहे. या सगळ्या प्रकरणामुळे सासरे नारायण मूर्ती यांच्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आरोपांच्या भोवऱ्यात अडकले आहेत.