कोणत्याही देशात मंत्रिमंडळाची पुनर्रचना हा एक कायमच औत्सुक्याचा विषय असतो. ‘लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते’ असे बिरुद मिरविणाऱ्या ब्रिटनमध्ये तर लोकशाहीची सर्व तत्त्वे तंतोतंत पाळली जातात, असा तमाम जगाचा समज. हे करताना सर्व नियम, कायदेकानू आणि प्रशासकीय बाबीही तेवढय़ाच महत्त्वाच्या. अशा वातावरणात ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेची घोषणा ट्विटरवरून केली..
मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल की नाही, आपण राहणार की आपल्याला वगळले जाणार, याच्या विवंचनेत कॅमेरून यांचे अनेक सहकारी त्यांच्या कार्यालयासमोर दीर्घकाळ ताटकळत होते, मात्र कॅमेरून यांनी आपल्या ट्विटरवरील दोन अधिकृत अकाऊंटद्वारे या पुनर्रचनेची घोषणा केल्यामुळे सर्व जण कमालीचे चकितच झाले. या दोन्ही ट्विटरवर कॅमेरून यांचे लक्षावधी चाहते आहेत. आपण ट्विटरवरूनच अशी घोषणा करणार असल्याची माहिती कॅमेरून यांनी दिली. विशेष म्हणजे, त्यांचा पक्ष विरोधात होता, त्या वेळी कॅमेरून यांनी ट्विटरच्या वापराबद्दल काहीशी नाराजीच दाखविली असताना आता त्यांनीच या समाजमाध्यमाचा वापर केला आहे.
दरम्यान, कॅमेरून यांच्या मंत्रिमंडळात बदल करण्यात आले असून विद्यमान शिक्षणमंत्री मायकेल गोव्ह यांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे. गोव्ह यांनी आपल्या कारकिर्दीत शिक्षण क्षेत्रात अनेक बदल केले होते. हे बदल वादग्रस्तही ठरले होते. गोव्ह यांच्या जागी शिक्षणमंत्रिपदी आता निकी मॉर्गन या आरूढ होत आहेत. त्यांच्याकडे याआधी असलेल्या महिला विकासमंत्रिपदाची जबाबदारी यापुढेही कायम राहणार आहे. संरक्षण राज्यमंत्रिपदी अॅना सौब्री यांची नियुक्ती करण्यात आली असून भारतीय वंशाच्या प्रीती पटेल या अर्थखात्याच्या मंत्री असतील. संरक्षणमंत्री फिलिप हॅमॉण्ड यांना परराष्ट्रमंत्रिपदी बढती मिळाली असून त्यांच्या जागी विद्यमान उद्योगराज्यमंत्री मायकेल फॉलॉन यांना बढती मिळाली आहे. बेकायदा स्थलांतरिताप्रकरणी या वर्षांच्या प्रारंभी राजीनामा दिलेले मंत्री मार्क हार्पर यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यांच्याकडे कार्य आणि निवृत्तिवेतन खात्याच्या राज्यमंत्रिपदाचा भार सोपविण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा