BBC नं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला एक माहितीपट अर्थात डॉक्युमेंटरी सध्या चर्चेत आली आहे. कारण यावरून भारतात सुरू झालेली चर्चा आता थेट ब्रिटिश संसदेपर्यंत जाऊन पोहोचली आहे. हा माहितीपट म्हणजे मोदींविरोधातील अपप्रचाराचा एक भाग असल्याची भूमिका गुरुवारी केंद्र सरकारने मांडल्यानंतर त्यावर थेट ब्रिटनच्या संसदेमध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश खासदाराने हा मुद्दा संसदेत उपस्थित केल्यानंतर त्यावर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मात्र मोदींची बाजू घेत या खासदारांनाच सुनावलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
नेमकं काय घडलं?
ब्रिटनच्या संसदेमधील पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसेन यांनी मोदी गुजरात दंगलींमध्ये सहभागी होते असा दावा करत पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भूमिका मांडण्याची मागणी केली. “ब्रिटनच्या परराष्ट्र खात्याच्या माहितीनुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दंगलींमुळे झालेल्या हिंसाचारासाठी थेट जबाबदार होते. भारतासह जगभरातील अनेक कुटुंबं यामुळे आजही मानसिक त्रास सहन करत आहेत. अनेकांना अजूनही न्याय मिळालेला नाही. पंतप्रधान (ऋषी सुनक) आपल्या परराष्ट्र विभागाच्या या भूमिकेशी सहमत आहेत का?” असा सवाल इम्रान हुसेन यांनी उपस्थित केला.
ऋषी सुनक यांनी खासदाराला सुनावलं!
दरम्यान, हुसेन यांच्या प्रश्नावर ऋषी सुनक यांनी लागलीच उत्तर देत त्यांचा मुद्दा खोडून काढला. “सभापती महोदय, यासंदर्भात ब्रिटिश सरकारची भूमिका कायम आहे. तिच्यात अजिबात बदल झालेला नाही. अर्थात, आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचं कुठेही समर्थन करत नाही. पण सन्माननीय सदस्य इम्रान हुसेन यांनी मांडलेल्या भूमिकेशी मी असहमत आहे”, अशा शब्दांत ऋषी सुनक यांनी हुसेन यांचा दावा फेटाळून लावत ब्रिटिश सरकारची या वादावर भूमिका स्पष्ट केली.
गुजरात दंगली घडल्या, त्यावेळी देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावरून गेल्या २० वर्षांत मोठं राजकारण पाहायला मिळालं आहे. यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले आहेत.
BBC च्या माहितीपटामुळे गुजरातमधील हिंसाचार पुन्हा चर्चेत
दरम्यान, बीबीसीच्या माहितीपटामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यासंदर्भात भारताची भूमिका मांडताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माहितीपटावर टीका केली. “आम्हाला माहीत नाही की या माहितीपटाच्या मागे नेमका काय उद्देश आहे, परंतु हा निष्पक्ष नाही. हा पंतप्रधान मोदींविरुद्धचा अपप्रचार आहे. हा माहितीपट भारतात प्रदर्शित केला गेला नाही. हा माहितीपट भारताविरोधात एक विशेष प्रकारच्या अपप्रचाराचे कथानक चालवण्याचा प्रयत्न आहे. माहितीपटात दिसते की याच्याशी निगडीत लोक आणि संघटना एका विशिष्ट विचारधारेचे आहेत. कारण त्यामध्ये तथ्यच नाहीत. यामधून गुलामीची मानसिकता दिसून येते”, असं बागची म्हणाले आहेत.