ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपली पत्नी अक्षता मूर्ती आणि दोन मुली यांच्यासह १० डाऊनिंग स्ट्रीटमधील छोटय़ा घरामध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ऋषी सुनक आपल्या कुटुंबासोबत या घरात राहण्यास जाणार असल्याचं त्यांच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे. त्या घरात जास्त आनंद मिळत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
टोनी ब्लेअर यांच्या काळापासून ब्रिटनचे पंतप्रधान शेजारच्या ११ डाऊनिंग स्ट्रीटमधील (अर्थमंत्र्यांचे कार्यालय) चार शयनगृहे असलेल्या घरात राहात होते. सुनक यांनी ही परंपरा मोडीत काढली आहे. सुनक स्वत: अर्थमंत्री असताना १० क्रमांकाच्या घरात राहत होते. आम्ही या घराची सजावट केली असून आमच्या कुटुंबासाठी ते पुरेसे आहे, असं सुनक यांनी जाहीर केलं आहे.
पंतप्रधान मोदींची ऋषी सुनक यांच्याशी चर्चा; दूरध्वनी संभाषणात संबंध दृढ करण्याबाबत एकमत
सुनक यांनी ऑगस्ट महिन्यात टाइम्स वृत्तपत्राशी बोलतानाही जर निवडून आलो तर आपण आधी राहत होतो त्या घरात पुन्हा वास्तव्यास जाऊ असं स्पष्ट केलं होतं. “आम्ही ते घर सजवलं असून, ते फार सुंदर आहे,” असं ते म्हणाले होते. पंतप्रधानांना राहत्या घरावर खर्च करण्यासाठी वर्षाला ३० हजार पौंड्स इतकं सार्वजनिक अनुदान मिळतं.
एप्रिल महिन्यात सुनक यचान्सलरपदाचा राजीनामा देण्यापूर्वी डाऊनिंग स्ट्रीट येथून वेस्ट लंडनच्या घरात राहण्यासाठी गेले होते. मुलीची शाळा तेथून जवळ असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता. चान्सलर म्हणून काम करताना शेवटच्या काही महिन्यात त्यांनी अधिकृत निवासस्थान आणि आपलं घऱ यामध्ये वेळ विभागून घेतली होती. दरम्यान, त्यांच्या या निर्णयाचं नागरिक स्वागत करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी सुनक यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. या वेळी दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्यासोबत मुक्त व्यापार करारावरही चर्चा झाली. सुनक यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
‘मी नव्या भूमिकेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानतो. सुरक्षा, संरक्षण आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून दोन्ही लोकशाही देश किती मोठी झेप घेऊ शकतात, याबाबत मी उत्साहित आहे,’ असं ट्वीट सुनक यांनी केले. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारेही सुनक यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ‘सर्वसमावेशक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आम्ही एकत्र काम करू. समतोल मुक्त व्यापार करार लवकरात लवकर अस्तित्वात यावा, यावरही आमचे एकमत झालं आहे,’ असं ट्वीट मोदींनी केले.
सुनक हे ब्रिटनचे सर्वात तरुण आणि पहिले बिगर-श्वेतवर्णीय पंतप्रधान झाल्यानंतर आता सरकार स्थिर झाल्याचे चित्र आहे. तसेच बोरीस जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री असताना सुनक हे भारतासोबत मुक्त व्यापार कराराचे पाठीराखे होते. त्यामुळे भारतासोबत व्यापार करारावर अधिक वेगाने काम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.