आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी ब्रिटिश राजघराण्यातील युवराज चार्लस्, त्यांचे बंधू अँड्रय़ू यांच्या नावाचा वापर प्रवास कागदपत्रे मिळवताना केला असे प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.
द संडे टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ललित मोदी यांनी त्यांचे अनेक वर्षांपासून परिचित असलेले राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे द्वितीय पुत्र व डय़ूक ऑफ यॉर्क अँड्रय़ू यांच्या नावाचा वापर केला. त्यांनी ब्रिटिश गृहमंत्रालयाकडे त्यांच्या पत्नीच्या कर्करोग शस्त्रक्रियेसाठी पोर्तुगालला जाण्यासाठी प्रवास कागदपत्रे गेल्या जुलैत मागितली होती.
बकिंगहॅम पॅलेसने ललित मोदी यांनी या दोघांच्या नावाचा वापर केल्याचा इन्कार केला आहे व डय़ूक ऑफ यॉर्क यांनी ललित मोदी यांच्या वतीने प्रवासी कागदपत्रे मिळवण्यासाठी रदबदली केल्याचा इन्कार केला आहे.
ललित मोदी हे आयपीएलनंतर २०१० मध्ये लंडनला गेले व त्यांच्यावर निकाल निश्चिती व बेकायदा सट्टेबाजीचा आरोप आहे. त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून भारतात आपल्याला ठार मारले जाण्याची भीती आहे असे म्हटले आहे. जून २०१४ मध्ये खासदार कीथ वाझ यांनी ब्रिटनच्या व्हिसा व स्थलांतर महासंचालक सारा रॅपसन यांना मोदी यांना कागदपत्रे उपलब्ध करून देण्यास सांगितले होते. ललित मोदी यांची पत्नी गंभीर आजारी असताना त्यांना तिच्यावर उपचारासाठी जायचे होते.
बकिंगहॅम पॅलेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, राजघराण्यातील व्यक्तींच्या खासगी भेटींची माहिती आम्ही देऊ शकत नाही, पण मोदी व डय़ूक ऑफ यॉर्क यांची अनेक वर्षांपासून ओळख आहे. पण त्यांनी कुठल्याही निर्णयावर प्रभाव टाकला नाही. मोदी यांच्याकडून त्यांनी भेटवस्तू किंवा आदरातिथ्य स्वीकारलेले नाही. युवराज चार्ल्स व त्यांची पत्नी कॅमिला हे ललित मोदींना अनेकदा कार्यक्रमात भेटले आहेत, असे क्लॅरेन्स हाउसने म्हटले आहे. ललित मोदी यांनी या सर्व आरोपांवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा