परदेशी वकिलातींच्या सुरक्षेत वाढ
झिंजियांग प्रांतात धुमाकूळ घालणाऱ्या दहशतवाद्यांकडून नाताळदरम्यान परदेशी नागरिकांना लक्ष्य करण्याच्या धमकी मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर चीनने महत्वाच्या ठिकाणी दहशतवादविरोधी पोलीस पथके तैनात केली आहेत. तसेच, अमेरिका, इंग्लड, फ्रान्स व इतर देशांच्या वकिलातींची सुरक्षा वाढवीत धोक्याचा इशाराही दिला आहे.
नाताळच्या काळात सुन्लितून परिसरातील परदेशी नागरिकांवर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. या परिसरात परदेशी नागरिकांचा मोठय़ा प्रमाणावर राबता असतो. तसेच, चिनी नागरिकांनासुद्धा सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुन्लितून जिल्ह्य़ात दहशतवादी हल्ल्यांशी मुकाबला करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आलेले विशेष हत्यारी पोलिस पथके नेमण्यात आले आहेत. चीनच्या सुरक्षायंत्रणा बऱ्याच काळापासून झिंजियांग आणि इतर प्रांतांतील दहशतवाद्यांशी लढत आहेत. पण, त्यांच्याकडून थेट हल्ल्याचा इशारा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. झिंजियांग प्रांतातील हिंसाचारासाठी चीनने विभाजनवादी ‘इस्ट तुर्कमेनिस्तान इस्लामिक मूव्हमेंट’ या संघटनेला जबाबदार धरले आहे. तिला ‘अल कायदा’चा पाठिंबा आहे. या प्रांतात हानवंशीयांच्या वसाहती वसविण्यास चीन सरकार उत्तेजन देत असल्यामुळे येथील मूळ रहिवासी असलेले उग्युर मुस्लिम अस्वस्थ आहेत. त्यातूनच या प्रांतात हिंसाचाराने थैमान घातले आहे.
सोमालिया-ब्रुनेईत नाताळोत्सवावर बंदी
मुस्लिमांच्या धार्मिक भावनांना तडा जाण्याच्या भितीतून सोमालिया व ब्रुनेई या देशांनी नाताळनिमित्त देशात आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक उत्सवांवर बंदी घातली आहे. दोन्हीही देश मुस्लिमबहुल असून ब्रुनेईच्या सुलतानाने उत्सव साजरा करणाऱ्यांवर पाच वर्षे बंदीवासाचा बडगा उगारणार असल्याचे मागील महिन्यातच सांगितले होते. तर सोमालियाने नाताळसमवेत नववर्षांच्या कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे. दोन्हीही उत्सव इस्लामी संस्कृतीच्या विरोधात असून त्यामुळे मुुस्लिमधर्मीयांच्या भावनांना तडा जाऊ शकतो, असे या देशांचे म्हणणे आहे.