दक्षिण गोव्यातील पालोलेम बीचजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास एका ४२ वर्षीय ब्रिटीश महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला कानाकोना रेल्वे स्टेशनवरुन पालोलेम बीचजवळील तिच्या घराच्या दिशेने निघालेली असताना अज्ञात आरोपींनी तिला रस्त्यात गाठून तिच्यावर बलात्कार केला. पालोलेम बीचजवळ भाडयाच्या घरात ती राहत होती.
गोवा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखेकडून गुन्हेगारांचा शोध सुरु झाला आहे. नाताळ सण पाच दिवसांवर आलेला असताना गोव्यामध्ये ही घटना घडली आहे. नाताळच्या सुट्ट्यांसाठी देश-विदेशातून मोठया संख्येने पर्यटक गोव्यात येतात. अशावेळी बलात्काराच्या या घटनेमुळे गोव्यातील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीडित महिलेने जे वर्णन केले आहे त्यावरुन आम्ही संशयितांची यादी तयार केली आहे असे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई यांनी सांगितले. आयपीसीच्या कलम ३७६ अंतर्गत पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. डिसेंबरपासून गोव्यात सुरु होणार पर्यटनाचा हंगाम मार्च अखेरपर्यंत असतो. पीडित महिला नेहमीच गोव्याला येत असते असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.