नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानावरून राज्यसभेत सभागृहनेते पीयुष गोयल आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये खंडाजंगी सुरू असताना ‘भारत राष्ट्र समिती’चे (बीआरएस) सदस्य के. केशव राव काँग्रेसच्या मदतीला धावल्याचे आश्चर्यकारक चित्र सोमवारी पाहायला मिळाले. भाजपविरोधात ‘आप’चे सदस्यही खरगेंना पाठिंबा देत होते. सभागृहातील या गोंधळात केशव राव यांनी राहुल गांधींच्या भूमिकेचे समर्थन केले.
‘मी देखील परदेशात जाऊन देशाच्या राजकारणावर अनेकदा बोललो आहे’, असे ते म्हणाले. तेलंगणाच्या राजकारणामध्ये काँग्रेसचे कट्टर विरोधक असलेल्या ‘बीआरएस’चे सदस्य वरिष्ठ सभागृहामध्ये काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले. संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी खरगेंच्या दालनामध्ये १६ विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीमध्ये विरोधकांची रणनिती निश्चित करण्यात आली. या बैठकीमध्ये ‘बीआरएस’ व तृणमूल काँग्रेसचे नेते सहभागी झाले नव्हते. सकाळच्या सत्रातील तहकुबीनंतर विजय चौकातील विरोधकांच्या पत्रकार परिषदेला मात्र ‘बीआरएस’ तसेच, ‘आप’चे सदस्य उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसने मात्र काँग्रेसला पाठिंबा देण्याचे टाळले.