तेलंगणामध्ये काही महिन्यांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. ज्यामध्ये काँग्रेसने भारत राष्ट्र समितीचा पराभव केला. भारत राष्ट्र समितीचे ३९ आमदार निवडून आले होते. भारत राष्ट्र समितीच्या एका तरुण आमदाराचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. यावेळी पहिल्यांदाच निवडून आलेल्या ३७ वर्षीय आमदार जी. लास्या नंदिता यांचा संगारेड्डी येथे अपघाती मृत्यू झाला. अमिनपूर मंडळ जिल्ह्यातील सुलतानपूर आऊटर रिंग रोड येथील रस्त्यावर नंदिता यांच्या वाहनाचा अपघात झाला. एसयुव्ही वाहनाचे नियंत्रण गमावल्यामुळे रस्त्याच्या विभाजकाला आदळून सदर अपघात झाला. ज्यामध्ये नंदिता यांना जबर दुखापत झाली.
अपघातानंतर आमदार नंदिता यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टारांनी त्यांना मृत घोषित केले. तर चालकालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. संगारेड्डीचे पोलीस अधिक्षक सीएच रुपेश यांनी सांगितले की, नंदिता या बसारा येथून गच्चिबावलीकडे प्रवास करत होत्या. वाहन चालवत असताना चालकाला डुलकी लागली असल्याची शक्यता आहे. अपघात इतका भीषण होता की, वाहनाच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. तसेच या अपघातात आमदार नंदिता यांचा खासगी सुरक्षा रक्षकही गंभीर जखमी झाला. सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थीव सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Manohar Joshi Passes Away : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
कोण होत्या आमदार नंदिता?
लास्या नंदिता यांचा जन्म हैदराबाद येथे १९८६ साली झाला. सुमारे एक दशकापूर्वी त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले होते. तेलंगणाच्या सिंकदराबाद कंटोन्मेंट येथून आमदार म्हणून निवडून येण्याआधी त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले होते. याआधी त्यांचे वडील जी. सयाना यांनी सिंकदराबाद कंटोन्मेंटची आमदारकी भूषविली होती. मात्र २०२३ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर नंदिता निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या होत्या. भारत राष्ट्र समितीनेही वडिलांच्या जागी मुलीला तिकीट दिले आणि त्या जिंकूनही आल्या.
बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निवेदन प्रसिद्ध करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे, तसेच नंदिता यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी आम्ही उभे आहोत, असे म्हटले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त केल्या. “नंदिता यांच्या अपघाती मृत्यूमुळे मला धक्का बसला आहे. त्यांचे वडिल एस सयाना यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते. मागच्या वर्षी याच महिन्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच महिन्यात एका वर्षाच्या अंतराने नंदिता यांचाही मृत्यू व्हावा, ही खूप दुर्दैवी बाब आहे”, अशी भावना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी व्यक्त केली.