भारत राष्ट्र समितीच्या नेत्या आमदार के.कविता यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीनंतर आता सीबीआयने अटक केली आहे. त्यामुळे के.कविता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. के.कविता यांना ईडीकडून १५ मार्च रोजी अटक झाली होती. तेव्हापासून त्या तुरुंगात असून न्यायालयाने दोनवेळा त्यांच्या कोठडीत वाढ केली होती. यानंतर आज (११ एप्रिल) तिहार तुरुंगातून सीबीआयने के कविता यांना ताब्यात घेतले आहे, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात के कविता यांची सीबीआयकडून चौकशी होणार आहे. आमदार के कविता यांच्या सीबीआय चौकशीला न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर सीबीआयकडून आज त्यांना अटक करण्यात आली. के कविता यांच्यावर दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाच्या नेत्यांशी १०० कोटींचा व्यवहार केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
काही दिवसांपूर्वी ईडीने के.कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी छापा टाकला. यावेळी त्यांनी चौकशीला योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, या दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केलेली आहे. तर काही महिन्यांपूर्वी दिल्लीचे माजी उमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही अटक करण्यात आली होती. तेदेखील सध्या तुरुंगात आहेत.
के.कविता कोण आहेत?
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या के.कविता या कन्या आहेत. तसेच त्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या असून सध्या आमदार आहेत. के कविता यांनी २०१४ मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केला होता. तसेच त्यांनी २०१४ ला लोकसभेची निवडणूक लढवली होती.