भारत राष्ट्र समितीच्या नेत्या, विधानपरिषदेच्या आमदार आणि माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के. कविता यांची शुक्रवारी प्राप्तीकर विभाग आणि ईडीकडून ताब्यात घेण्यात आले. के. कविता यांच्या हैदराबादमधील निवासस्थानी दोन्ही तपास यंत्रणांनी छापेमारी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज दुपारी दिल्लीहून १० अधिकारी चौकशीसाठी हैदराबादमध्ये आले होते. के. कविता आणि त्यांचे पती डी. अनिल कुमार यांच्या समोरच घराची झडती घेण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली अबकारी धोरण प्रकरणाशी संबंधित ही चौकशी करण्यात येत आहे. दिल्लीतील मद्य घोटाळ्यात के. कविता यांचेही नाव गुंतले होते.
प्राप्तीकर विभाग आणि ईडीने कविता यांना काही नोटीस बजावल्या होत्या. मात्र या नोटीशींच्या विरोधात कविता सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्यामुळे या नोटीशींना त्यांनी आजवर उत्तर दिले नव्हते.
ईडीने आपल्या आरोपपत्रात नमूद केल्यानुसार, केसीआर यांच्या सुपुत्री असलेल्या कविता या आम आदमी पक्षाला १०० कोटींची लाच देणाऱ्या ‘साऊथ ग्रुप’च्या भाग आहेत. दिल्लीतील अबकारी धोरण बदलून आपल्याला फायदा मिळेल, असे धोरण आखण्यासंबंधी ही लाच देण्यात आली होती. कविता यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. तसेच ईडीची नोटीस ही मोदी नोटीस असल्याची बोळवण त्यांनी केली होती.
ईडीने कथित मद्यविक्री घोटाळ्यासंदर्भात दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. या आरोपपत्रांत दक्षिण गटाने दिल्लीमधील घाऊक आणि किरकोळ मद्यविक्री क्षेत्रात प्रवेश करता यावा, म्हणून लाच दिल्याचा दावा करण्यात आला आहे. ईडीच्या तक्रारीनुसार आम आदमी पार्टीचे कम्युनिकेशन इन्चार्ज विजय नायर यांना दक्षिण ग्रुपने १०० कोटी रुपये दिले होते. विजय नायर यांनी ‘आप’चे प्रतिनिधित्व केले होते. या दक्षिण गटामध्ये आंध्र प्रदेशमधील ओंगले येथील खासदार मागुंता श्रीनिवासुलू रेड्डी, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या कलवकुंतला कविता (के. कविता) अशा दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. तसेच या दक्षिण ग्रुपमध्ये मागुंता रेड्डी यांचे पुत्र राघव रेड्डी, अरबिंदो फार्मा कंपनीचे संस्थापक पी. व्ही. रामप्रसाद रेड्डी यांचे पुत्र पी. सारनाथचंद्र रेड्डी यांचाही यामध्ये समावेश आहे.