ट्रान्सपोर्ट मॅनेजर म्हणून सात वर्षांपासून एके ठिकाणी काम करत असलेल्या एका माणसाला चोरीच्या संशयामुळे जीव गमवावा लागला आहे. मालकाने सात गुंडासह या ट्रान्सपोर्ट मॅनेजरला मारहाण केली, त्याआधी त्याला खांबाला बांधण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशातल्या शाहजहांपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
नेमकी काय घडली घटना?
शाहजहांपूर या ठिकाणी असलेल्या कोतवाली भागात सूरी ट्रान्सपोर्टमध्ये शिव जौहरी नावाचा एक तरूण गेल्या सात वर्षांपासून ट्रान्सपोर्ट मॅनेजर म्हणून काम करत होता. या ट्रान्सपोर्टचे व्यापारी कन्हैय्या हौजरी यांना काही दिवसांपूर्वी चोरी झाल्याची घटना समोर आली. ही चोरी या मॅनेजर शिवमने केली असावी असा संशय मॅनेजरला आला. त्यानंतर मॅनेजरने शिवमला खांबाला बांधून मारहाण केली.
नक्की काय काय घडलं?
चोरीच्या संशयातून शिवमला खांबाला बांधण्यात आलं. त्यानंतर त्याला सात गुंडांनी मारहाण केली. तसंच त्याला चाबकाचे फटके देण्यात आले. त्याच्या अंगाला वीजेचा शॉकही दिला गेला. इतकी जबर मारहाण झाल्याने शिवमचा मृत्यू झाला. त्याचं प्रेत हौजरींसोबतच्या गुंडांनी एका रूग्णालयासमोर फेकलं. त्यानंतर शिवमच्या वडिलांनी या प्रकरणात कन्हैय्या हौजरी आणि नीरज गुप्ता यांच्या विरोधात पोलीस तक्रार केली. यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली.
पोलिसांनी यानंतर मालकासह सात जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. या सातही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.