पीटीआय, सिद्धार्थ नगर
दोन हजार रुपये चोरल्याच्या संशयावरून शुक्रवारी तरुणांच्या एका गटाने दोन अल्पवयीन मुलांना पेट्रोलचे इंजेक्शन टोचून त्यांचे शारीरिक उत्पिडन केले, त्यांना लघवी पिण्यास भाग पाडले. हा प्रकार रविवारी उघडकीस आला. पोलिसांनी आठ आरोपींपैकी सहा जणांना अटक केली आहे.
अत्याचारित अल्पवयीन मुलांपैकी एकाचे वडील मोहंमद हुसैन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली, तर दोघांचा शोध सुरू आहे. सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील पाथ्रा बाजार परिसरात शुक्रवारी दुपारी एका चिकन विक्रीच्या दुकानावर हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
अफझल आणि विजय सहानी या अल्पवयीन मुलांनी दोन हजार रुपये चोरल्याच्या संशयावरून आरोपींनी त्यांचे हात बांधले. त्यानंतर त्यांच्यावर वरील अत्याचार केले, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकाराची चित्रफीत बनवून समाज माध्यमांवर प्रसारित केली होती. ती शनिवारी सर्वत्र पसरल्यानंतर पोलीस अधीक्षक अभिषेक कुमार अगरवाल यांनी कारवाईचे आदेश दिले.