सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक डी.के.पाठक यांनी गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली.
दरम्यान जम्मूतील अखनूर भागात पाक रेंजर्स व सीमा सुरक्षा दल यांची ध्वज बैठक बुधवारी झाली. सीमेवरील ताण निवळण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होऊ शकतो. पाकिस्तानने सीमेवरील भारतीय छावण्या व खेडय़ांवर मोठय़ा प्रमाणात गोळीबार केला होता.
पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या मालमत्तांचे नुकसान झाले तसेच सीमेलगत राहणाऱ्या लोकांच्या घरांवर तोफगोळे पडले. या शस्त्रसंधी उल्लंघनात दोन नागरिक मरण पावले असून इतर सतरा जण जखमी झाले आहेत, याशिवाय सीमा सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले आहेत. गेले ४५ दिवस पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सीमेपलीकडून अर्णिया, आरएस पुरा, रामगड, अखनूर व कनाचक भागात पाकिस्तानने गोळीबार केला. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सैन्यदलाच्या मनोधैर्याबाबत विचारपूस केली. सैन्यदलांचे मनोधैर्य उंचावलेले आहे असे पाठक यांनी सांगितले.
सीमा सुरक्षा दलाने केलेल्या कामगिरीचे राजनाथ सिंग यांनी कौतुक केले व त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले. सीमा सुरक्षा दलाने असे म्हटले आहे, की १९७१ नंतर प्रथमच पाकिस्तानने ४५ दिवस गोळीबार केला.
भारताने सीमेवरील शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत पाकिस्तानकडे निषेध नोंदवला. लष्करी कामकाज महासंचालकांच्या दूरध्वनीवरील चर्चेत हा निषेध नोंदवण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा