गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा चांगलाच तापतोय. याच मुद्द्यावरून पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपा आणि तृणमूल काँग्रेस आमनेसामने आले होते. त्यात दोन दिवसांपूर्वी रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना हाकलून लावण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही सर्व पार्श्वभूमी असताना एका भारतीयाला बांगलादेशमध्ये जाऊन लग्न करणं चांगलंच महाग पडलं आहे. सीमा सुरक्षा दलाने नवविवाहित जोडप्याला अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यातील जयकान्तो चंद्रा राय या २४ वर्षीय तरुण सोशल मीडियावरून बांगलादेशी तरुणीच्या प्रेमात पडला होता. महिनाभर दोघांमध्ये हाय हॅलो चाललं. दोघांचे विचार जुळल्यानंतर हळूहळू प्रेम बहरू लागले. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आणि लंग्न करण्याचं ठरवलं.

जयकान्तो चंद्रा राय हा पश्चिम बंगालमधील बल्लावपूर गावातील तरुण आहे. तर चंपा (बदलेलं नाव) ही १८ वर्षीय तरुणी बांगलादेशमधील नेराळी गावात राहणारी आहे. या दोघांचं फेसबुकवरून सुत जुळलं. त्यानंतर जयकान्तो ८ मार्चला सीमा पार करून बांगलादेशात गेला. त्याला बांगलादेशात जाण्यासाठी एका दलालाने मदत केली. १० मार्चला दोघांचं लग्न झालं. २५ जूनपर्यंत दोघंही बांगलादेशमध्ये राहिले. त्यानंतर त्या दोघांनी भारतात येण्यासाठी बांगलादेशमधील एका दलालाची भेट घेतली आणि त्याला १० हजार बांगलादेशी टाका दिले. त्याच्या मदतीने ते भारतीय सीमेत घुसले. २६ जूनला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना अनधिकृतपणे मधुपूर येथे काही जण घुसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या दोघांना ताब्यात घेतलं. चौकशी केल्यानंतर त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या विभागणीमुळे दहशतवादी कारवाया कमी झाल्या – केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पुढील कारवाईसाठी त्यांना भीमपूर पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. आता पोलीस त्यांची कसून चौकशी करत असून यासाठी कुणी कुणी मदत केली याचा शोध घेत आहेत.

Story img Loader