सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) जवान तेज बहादूर यादवने जेवणाच्या सुमार दर्जाविषयी केलेल्या आरोपाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्याच्या पत्नीने केली आहे. तत्पूर्वी गृहमंत्रालयाने यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाकडे सादर केलेल्या अहवालात हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते. तेज बहादूरच्या तक्रारीत तथ्य आढळलेले नाही असे गृहमंत्रालयाने म्हटले होते. मात्र, याप्रकरणाची केवळ अंतर्गत चौकशी न करता या सगळ्याचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा , असे तेज बहादूरची पत्नी शर्मिला हिने म्हटले आहे.
We don't want an internal inquiry, CBI must inquire.Truth will be out only then: Sharmila,wife of Tej Bahadur(BSF jawan in video) pic.twitter.com/O1mBkkfv4R
— ANI (@ANI) January 14, 2017
तर दुसरीकडे देहरादून येथील भारतीय लष्कराच्या तुकडीत तैनात असलेल्या यज्ञ प्रताप सिंह यानेदेखील सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून लष्करी अधिकाऱ्यांकडून जवानांच्या होत असलेल्या शोषणाचा पाढा वाचला होता. त्यानंतर आता यज्ञ प्रताप सिंह याने उपोषण सुरू केल्याची माहिती त्याची पत्नी रिचा सिंह हिने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. रिचा सिंह यांच्या माहितीनुसार, यज्ञ प्रताप सिंह यांचा फोन काढून घेण्यात आला आहे. त्यांनी दुसऱ्या एका फोनवरून पत्नीला यासंदर्भात सांगितले. फोनवर हे सगळे सांगताना ते रडत होते. हे वृत्त सगळ्यांपर्यंत पोहचावे आणि त्यांच्या उपोषणाची दखल घेण्यात यावी, असे रिचा सिंह यांनी म्हटले आहे. यज्ञ प्रताप सिंह याने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत १५ जूनला राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यांना सर्व प्रकाराची माहिती दिल्याचा दावा केला होता. ही बाब लष्कराच्या अधिकाऱ्यांना समजली तेव्हा त्यांना याबद्दल सुनावण्यात आले होते. आता यावरुन आपले कोर्ट मार्शल केले जाऊ शकते, अशी शक्यताही यज्ञ प्रताप सिंह याने बोलून दाखवली होती. दरम्यान, आता या दोन्ही प्रतिक्रियांवर गृह मंत्रालय आणि लष्कर काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
[jwplayer DMXAiw19]
सीमा सुरक्षा दलातील तेज बहादूर यादव या जवानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तेज बहादूरने जवानांना मिळणा-या जेवणाचा दर्जा सुमार असल्याचे म्हटले होते. केंद्र सरकारकडून देशभक्तीचे दाखले दिले जात असताना जवानांना मिळणा-या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले होते. या व्हिडिओत तेज बहादूरने त्यांना दररोज पुरेसे आणि चांगले अन्न मिळत नसल्याचे म्हटले होते. एवढेच नव्हे तर अनेकदा आमच्यावर उपाशीपोटी झोपायची वेळ आल्याचा दावा त्याने केला होता. सोशल मीडियावर तेज बहादूर यादवचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे सैन्यातील अधिकाऱ्यांकडून सुरू असणारा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला. या भ्रष्ट अधिका-यांमुळे सीमा रेषेवरील जवानांना कसा त्रास सहन करावा लागतो हेदेखील समोर आले होते. या व्हिडीओवरुन टीका सुरु होताच पंतप्रधान कार्यालयाने गृह मंत्रालयाकडून अहवाल मागितला होता. तर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.
[jwplayer dHfV2qCI]