जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बुधवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) केलेल्या तुफान गोळीबारात पाकिस्तानचे आठ ते दहा सैनिक ठार झाल्याचे समजते.

प्राथमिक माहितीनुसार, बीएसफच्या जवानांनी पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या उखळी तोफांच्या माऱ्याचा दिशेचा अंदाज घेतला आणि त्या दिशेने जोरदार गोळीबार केला. बीएसएफच्या जवानांचा अंदाज खरा ठरल्यामुळे हा मारा अचूकपणे झाले. त्यामध्ये पाकिस्तानी बंकर्सच्या जवळपास असणारी सोलार पॅनल्स आणि अन्य शस्त्रे उद्ध्वस्त झाली. त्यांच्या बंकर्सचेही मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती जम्मू बीएसएफचे महासंचालक रामावतार यांनी दिली. ‘टाईम्स नाऊ’ वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, बीएसएफच्या जवानांनी केलेल्या या गोळीबारात आठ ते दहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले. जम्मू-काश्मीरच्या राजबाग परिसरात काल रात्री पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल आर.पी. हाजरा शहीद झाले होते. आर.पी. हाजरा यांचा काल वाढदिवस होता. त्यामुळे भारतीय जवान पेटून उठले आणि त्यांनी त्वेषाने गोळीबार करत पाकिस्तानला नामोहरम केले.

गेल्या वर्षभरात पाकिस्तानने ८०० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून २०१८ च्या सुरुवातीलाही पाकच्या कुरापती सुरुच आहेत. २३ डिसेंबर रोजी केरी सेक्टर येथे पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यात ३ जवान शहीद झाले होते. यामध्ये भंडाऱ्याचे सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचाही समावेश होता. पाकच्या गोळीबारात गेल्या वर्षभरात सैन्याचे १४ जवान, १२ नागरिक आणि बीएसएफच्या ४ जवानांनी जीव गमावला होता.

Story img Loader