सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. गुजरातमधील नादियाद येथे ही घटना घडली आहे. मेलजीभाई वाघेला मुलीचा आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याने जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी संबंधित मुलाच्या कुटुंबीयांनी वाघेला यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी सातजणांना बेड्या ठोकल्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलाने वाघेला यांच्या मुलीचा आक्षेपार्ह व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट केला होता. यानंतर ते जाब विचारण्यासाठी मुलीच्या घऱी पोहोचले होते. वाघेला यांच्यासह त्यांची पत्नी, दोन मुलं आणि पुतण्या होता. यावेळी मुलाच्या नातेवाईकांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढला असता मुलाच्या कुटुंबाने वाघेला यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा वाघेला यांच्या मुलीच्या वर्गात शिकत असून दोघेही नात्यात होते. पोलिसांनी याप्रकरणी सातजणांना अटक केली आहे.