ओदिशातील कंधमालमध्ये माओवाद्यांच्या कारवायांत वाढ
नक्षलवाद्यांनी कोरापुट जिल्ह्य़ातील जंगलात घडवून आणलेल्या स्फोटात या भागात मोटारसायकल गस्तीवर असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका अधिकाऱ्यासह एका जवानाचा मृत्यू ओढवला.
डाव्या विचारांचा अतिरेकवाद हे ओदिशासाठी चिंतेचे मोठे कारण आहे. बोलांगीर, कालाहांडी, कंधमाल व बौध जिल्ह्य़ांमधील माओवाद्यांच्या अलीकडच्या कारवाया चिंताजनक असून त्यांचा परिणामकारकरीत्या मुकाबला केला पाहिजे, असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी म्हटले असतानाच कोरापुटमध्ये हा हल्ला झाला आहे.
दंडबारी खेडय़ात एक शोधमोहीम राबवल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या सुमारे २० कर्मचाऱ्यांचे पथक १० मोटारसायकलींवरून परत येत असताना दुपारी १ वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला.
आघाडीच्या मोटारसायकलवरील पथक प्रमुख व त्यांचा जवान या सापळ्यात अडकले. कालियाझुला जंगलात नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट केला असता मोटारसायकल चालवणारा जवान एस.पी. पांडा जागीच ठार झाला, तर मागे बसलेले व जखमी झालेले पथक प्रमुख डेप्युटी कमांडर सुनील कुमार बेहरा कोरापुट येथील जिल्हा रुग्णालयात मरण पावले.
नक्षलवाद्यांनी हुशारीने लपवलेल्या व रस्त्याखाली पेरून ठेवलेल्या आयईडीमध्ये वापरलेली तीव्र स्फोटके आणि टोकदार खिळे यामुळे दोघांनाही प्राणघातक जखमा झाल्या.
स्फोटामुळे मोटारसायकल ज्या ठिकाणी उडाली, तेथे एक मोठा खड्डा तयार झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.