अमृतसरच्या रानिया सीमेजवळ तैनात सीमा सुरक्षा दलाच्या पथकाने रविवारी भारतीय हवाई हद्दीत फिरणाऱ्या एका अनोळखी ड्रोनवर गोळीबार करत ते पाडण्यात यश मिळवले आहे. या ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची खेप पोहोचवण्यात येत असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या तीन दिवसांतली ही दुसरी घटना असून दोन दिवसांपूर्वी गुरुदासपूर सीमेजवळही अशाच प्रकारे एक ड्रोन पाडण्यात आला होता.
हेही वाचा – एमबीबीएस अभ्यासक्रम प्रथमच हिंदी भाषेतून ; अमित शहांच्या हस्ते पाठय़पुस्तकांचे प्रकाशन
सीमा सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, हा ड्रोन १२ किलो वजनाचा असून अंमली पदार्थांची खेप पोहोचवण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात येत होता. हा ड्रोन रविवारी रात्री ९.१५ च्या सुमारास सुरक्षा दलाच्या नजरेत पडला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यावर गोळीबार करत त्याला जमिनीवर पाडण्यात यश मिळवले. हा ड्रोन पाकिस्तानमधून आल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानी हवाई हद्दीतून भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ड्रोनला गुरुदारपूर सीमेजवळ पाडण्यात आले होते. या ‘ड्रोन’ला एक दोरखंड लावलेला होता.