अमृतसरच्या चहरपूर गावात तैनात सीमा सुरक्षा दलाच्या पथकाने सोमवारी रात्रीच्या सुमारास पाकिस्तानातून भारतीय हद्दीत प्रवेश करणाऱ्या एका ड्रोनवर गोळीबार करत ते पाडण्यात यश मिळवले आहे. या ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची खेप पोहोचवण्यात येत असल्याचा संशय सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी हे ड्रोन आणि ड्रोनला बांधण्यात आलेल्या पांढऱ्या प्लॅस्टीक बॅगमधून काही वस्तूही जप्त केल्या आहेत.
सीमा सुरक्षा दलाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (२८ नोव्हेंबर) रात्री ११ च्या सुमारास चहरपूर सीमेजवळ तैनात सीमा सुरक्षा दलाच्या पथकाला एक ड्रोन पाकिस्तानातून भारतीय हद्दीत प्रवेश करताना दिसून आले. त्यानंतर सीमा सुरक्षाच्या सैनिकांनी या ड्रोनवर गोळीबार करून ते पाडण्यात यश मिळवले. तसेच यासंदर्भातील माहिती वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना देण्यात आली. सीमा सुरक्षा दलाने हे ड्रोन जप्त केले असून या ड्रोनद्वारे अमली पदार्थांची खेप पोहोचवण्यात येत असल्याच्या अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून ड्रोनद्वारे अंमली पदार्थ भारतात पोहोचवण्याच्या घटनामंध्ये सातत्याने वाढ होते आहे. काही दिवसांपूर्वीच अमृतसरच्या रानिया सीमेजवळ तैनात सीमा सुरक्षा दलाच्या पथकाने भारतीय हवाई हद्दीत फिरणाऱ्या एका अनोळखी ड्रोनवर गोळीबार करत ते पाडण्यात यश मिळवले होते. या ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची खेप पोहोचवण्यात येत होती. तसेच या घटनेच्या तीन दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे एक ड्रोन गुरुदासपूर सीमेजवळही पाडण्यात आले होते.