दलितविरोधी वक्तव्याप्रकरणी बसपच्या मिश्रा यांची मागणी; सभागृहात गदारोळ

सत्ताधारी भाजपला दलितविरोधी ठरवणारा मुद्दा काँग्रेसकडून बहुजन समाज पक्षाने पळवला आहे. राज्यसभेत दाखल झालेले माजी लष्करप्रमुख व केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी दलितविरोधी वक्तव्य करून राज्यघटनेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांची सभागृहातून हकालपट्टी करावी, अशा अत्यंत आक्रमक शब्दांत बहुजन समाज पक्षाचे अ‍ॅड. सतीशचंद्र मिश्रा यांनी सत्ताधारी भाजपवर हल्ला चढविला. त्यांच्या आक्रमकपणामुळे खुद्द काँग्रेसचे नेतेदेखील आक्रमक झाले. काही क्षणांनंतर हा मुद्दा आपलाच असल्याचे लक्षात येताच काँग्रेस खासदारदेखील बसपला सामील झाले व व्ही. के. सिंह यांना सभागृहातून बाहेर काढण्यासाठी उपसभापती पी. जे. कुरियन यांच्या आसनासमोर घोषणाबाजी करू लागले. या मागणीपुढे हतबल झालेल्या कुरियन यांनी राज्यसभेचे कामकाज दोनदा तहकूब केले.
व्ही. के. सिंह यांनी हरयाणातील दलित जळीत हत्याकांडप्रकरणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून बुधवारी काँग्रेसने लोकसभेत त्यांच्या माफीनाम्याची मागणी करीत सभात्याग केला होता. गुरुवारी मात्र काँग्रेस सदस्यांनी हा मुद्दा लोकसभेत गुंडाळला. परंतु राज्यसभेत मात्र दुपारी भोजनोत्तर सभागृहात दाखल झालेल्या व्ही. के. सिंह यांच्यावर सतीशचंद्र मिश्रा यांनी थेट आरोपच करण्यास सुरुवात केली. ‘व्ही. के. सिंह यांनी दलितांचा अपमान केला आहे.. त्यांनी राज्यघटनेच्या तत्त्वांचे उल्लंघन केले आहे.. त्यांची सभागृहात हकालपट्टी करावी..’ अशी मागणी मिश्रा करीत होते. त्यावर, राज्यघटनेचा अधिकार कुणी केला, हे ठरवण्याचा अधिकार मला नाही, असे सांगून कुरियन यांनी मागणी फेटाळली.

गोयल यांची दिलगिरी
माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा यांच्यावर ‘निर्मित भेदभाव’ केल्याचा थेट आरोप करणाऱ्या केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी बुधवारी वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्याचे पडसाद आजही उमटले. राज्यसभेचे कामकाज दोनदा तहकूब झाले होते. अखेरीस गोयल यांनी दिलगिरी व्यक्त केली व या वादावर पडदा पडला.

राज्यसभेत गुरुवारी बसपाचे सतीशचंद्र मिश्रा यांनी केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांच्यावर कारवाईची मागणी केली.

Story img Loader