पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन I.N.D.I.A. अर्थात इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीमध्ये काँग्रेस, ठाकरे गट, तृणमूलसह अनेक मोठ्या व प्रमुख विरोधी पक्षांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील सत्तासमीकरणं लोकसभा निवडणुकांसाठी महत्त्वाची ठरतात. त्यामुळे उत्तर प्रदेशमधून विरोधकांच्या आघाडीला किती पाठिंबा मिळतो? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील एक महत्त्वाचा विरोधी पक्ष असणाऱ्या बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मध्य प्रदेशमधील दुसरा प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या सपानं इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय याआधीच जाहीर केला आहे. काँग्रेसही या आघाडीत असताना फक्त बसपाकडून स्पष्ट भूमिका जाहीर होणं शिल्लक होतं. आता मायावतींनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून पुढील राजकीय वाटचाल कशा प्रकारे होईल, याबाबत स्पष्ट धोरण ट्वीटमधून मांडलं आहे.
“खोट्या बातम्या पसरवू नका”
“एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये बहुतेक पक्ष हे गरीबविरोधी, जातीय, सांप्रदायिक, श्रीमंतांच्या बाजूने काम करणारे आहेत. त्यांच्या याच धोरणांच्या विरोधात बसपा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. त्यामुळे या आघाडीमध्ये सहभागी होऊन निवडणूक लढण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे माध्यमांनी खोट्या बातम्या पसरवू नयेत”, असं मायावतींनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे.
लोकसभा स्वबळावर लढणार
दरम्यान, एकीकडे मायावतींनी इंडियामध्ये सहभागी होण्यास नकार दिलेला असताना त्या भाजपाला मदत करत असल्याची टीका केली जात होती. मात्र, आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं मायावतींनी स्पष्ट केलं आहे. “विरोधकांच्या जुगाडापेक्षा समाजातल्या कोट्यवधी उपेक्षितांमध्ये बंधुभावाच्या आधारे जोडून त्यांच्या आघाडीसह २००७ प्रमाणेच आगामी लोकसभा व चार राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका एकट्याने लढेल”, असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“बसपाशी आघाडी करण्यासाठी सगळेच इच्छुक झाले आहेत. पण असं न केल्यास भाजपाशी हातमिळवणी केल्याचा आरोप होतो. त्यांच्याशी हातमिळवणी केली तर धर्मनिरपेक्ष आणि नाही केली तर मात्र भाजपासमर्थक. हे पूर्णपणे चुकीचं आहे”, असंही मायावतींनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मायावतींनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये विरोधकांच्या आघाडीला इंडिया आघाडीला भाजपाबरोबरच बसपाचंही आव्हान असेल असं चित्र आता निर्माण झालं आहे.