दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्यानंतर बहुजन समाज पक्षातील नेत्याच्या मुलाने हातात पिस्तूल घेऊन गोंधळ घातल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ पी सिंह यांनी पोलीस कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नसल्याचं म्हटलं आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ओ पी सिंह यांनी सांगितलं आहे की, उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी आशिष पांडेच्या अटकेसाठी पथकं तयार केली आहेत. आशिष पांडे हा बहुजन समाज पक्षाचे माजी खासदार राकेश पांडे यांचा मुलगा आहे. आशिष पांडे हातात पिस्तुल घेऊन एका तरुणीला आणि तिच्या मित्राला धमकावत असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
पोलिसांनी आशिष पांडेचे वडील, भाऊ रितेश पांडे किंवा इतर मित्र आणि कुटुंबीयांशी संवाद साधला आहे का असं विचारला असता ओ पी सिंह यांनी पोलीस त्याची माहिती मिळवण्यात सक्षम असून गरज नसल्याचं सांगितलं. पोलीस आशिष पांडेच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळवत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Video: हातात पिस्तुल घेऊन बसपा नेत्याच्या मुलाचा पंचतारांकित हॉटेलमध्ये राडा
‘आम्हाला आशिष पांडेबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मात्र आम्ही ती जाहीर करु शकत नाही’, असं ओ पी सिंह यांनी सांगितलं आहे. आशिष पांडेचा भाऊ रितेश पांडे बसपाचा आमदार आहे. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरमधील जलालपूर हा त्यांचा मतदारसंघ आहे.
आशिष पांडेच्या राजकीय पार्श्वभुमीचा पोलीस तपासावर काही परिणाम होईल का असं विचारलं असता ओ पी सिंह यांनी, पोलीस कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही. जे काही करण्यात येईल ते कायद्याला अनुसरुन असेल असं सांगितलं. दरम्यान आशिष पांडेचा शस्त्र परवाना रद्द करण्यासाठी हालचाल सुरु केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आशिष पांडेने 2000 मध्ये आंबेडकर नगर जिल्ह्यातून पिस्तूल खरेदी केलं होतं.
उत्तर प्रदेश पोलिसांनी सीमारेषेवरील जिल्ह्यांना आशिष पांडेला नेपाळला पळण्यापासून रोखण्यासाठी आदेश दिला आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलीस संयुक्तपणे आशिष पांडेची माहिती मिळवत असून त्याच्यावर नजर ठेवून आहेत. लवकरात लवकर आशिष पांडेला अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.