Religion Transformation Gujarat : बौद्ध धर्म हा वेगळा धर्म मानला गेला पाहिजे. हिंदू धर्मातून बौद्ध, जैन, शीख किंवा अन्य कुठल्याही धर्मात धर्मांतर करायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची तशी संमती घेणं गरजेचं आहे. गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्यातील २००३ च्या तरतुदी प्रमाणे ते सक्तीचं आहे असं म्हटलं आहे. गुजरात सरकारने यासंदर्भात काढलेलं परिपत्रक चर्चेत आलं आहे.
बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या अर्जांवर नियमाप्रमाणे कार्यवाही होत नाही ही बाब लक्षात आल्यानंतर गुजरात सरकारने ८ एप्रिल रोजी हे परिपत्रक काढलं आहे. बौद्ध धर्म हा स्वतंत्र धर्म असून धर्मांतरासाठी आधी जिल्हाधिकाऱ्यांची संमती आवश्यक असल्याची बाब यात नमूद करण्यात आली आहे. गुजरात राज्याच्या गृह विभागाचे उपसचिव विजय बधेका यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक काढण्यात आलं आहे. गुजरातमध्ये दसऱ्याच्या दिवशी आणि इतर महत्त्वाच्या सणांच्या दिवशी दलित बांधव हे बौद्ध धर्म स्वीकारतात. त्या अनुषंगाने हे पत्रक काढण्यात आलं आहे.
गुजरात सरकारचं परिपत्रक चर्चेत
गुजरात सरकारने जे परिपत्रक काढलं आहे त्यात ही बाबही नमूद करण्यात आली आहे की गुजरात मधली जिल्हाधिकारी कार्यालयं गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्याचा अर्थ त्यांना हवा तसा घेत आहेत. हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात परिवर्तन करण्याची संमती मागणाऱ्या अर्जांवर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. तसंच काहीवेळा असंही निदर्शनास आलं आहे की अर्जदार स्वायत्त संस्थांकडून असे निवेदन आणतात की हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात परिवर्तन करण्यासाठी पूर्व संमती आवश्यक नाही. मात्र ही बाब तशी नाही. बौद्ध हा वेगळा धर्म आहे. या धर्मात परिवर्तन करायचं असेल तर संमती घेणं अनिवार्य आहे असं आता गुजरात सरकारने स्पष्ट केलं आहे.
हे पण वाचा- २५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?
गुजरात सरकारच्या परिपत्रकात ही बाब प्रकर्षाने नमूद करण्यात आली आहे की गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्यान्वये बौद्ध धर्म हा स्वतंत्र धर्म आहे. या कायद्यानुसार हिंदू धर्मातून बौद्ध, शीख, जैन किंवा कुठल्याही धर्मात धर्मांतर करायचे असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.
गृह विभागाच्या अधिकाऱ्याने काय म्हटलं आहे?
गुजरातच्या गृहविभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला हे सांगितलं, “काही जिल्हाधिकारी हे हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यासंदर्भातल्या अर्जावर निर्णय घेताना चुकीचा पायंडा पाडत आहेत. नियमांचा चुकीचा अर्थ लावला जातो आहे ही बाब निदर्शनास आल्यानेच गुजरात सरकारने हे पत्रक काढले आहे. आम्ही काही जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली होती. त्यांच्याकडून जी उत्तरं आम्हाला मिळाली त्यानंतर आम्ही हे पत्रक काढलं आहे.”
गुजरात बुद्धिस्ट अकादमीचे रमेश बनकर काय म्हणाले?
गुजरातमध्ये बौद्ध धर्म स्वीकारलं जाणं मोठ्या प्रमाणावर होतं. गुजरात बुद्धिस्ट अकादमी या संस्थेतर्फे धर्मांतर कार्यक्रम आयोजित केले जातात. याच अकादमीचे सचिव रमेश बनकर यांनी या परिपत्रकाचं स्वागत केलं आहे. कायद्याचा चुकीचा अर्थ आत्तापर्यंत लावला जात होता. आता सरकारच्या परिपत्रकामुळे हे स्पष्ट झालं आहे की बौद्ध हा वेगळा धर्म आहे आणि त्याचा हिंदू धर्माशी संबंध नाही. प्रशासनातल्या काही जणांनी संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं होतं ते या पत्रकामुळे दूर झालं आहे असं बनकर यांनी म्हटलं आहे.