Budget 2019: मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनेवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली आहे. शेतकऱ्यांना प्रतिदिवस १७ रुपये देऊन मोदी सरकारने शेतकऱ्यांचा अपमानच केला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

शुक्रवारी हंगामी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली. शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा सरकारने केली. मोदी सरकारच्या या योजनेवरुन राहुल गांधी यांनी टीका केली. राहुल गांधी म्हणाले, मोदीजी, गेल्या पाच वर्षात तुमच्या अकार्यक्षम आणि उद्धट सरकारने शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. आता या शेतकऱ्यांना दिवसाला १७ रुपये देणे हा त्यांचा अपमानच आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

काय आहे मोदी सरकारची योजना?
दुष्काळ आणि नापिकीचा सामना करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मालकी शेतकऱ्यांचा याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी वर्षाला ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Story img Loader