केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी नवीन नाणी चलनात येणार असल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे सध्या चलनात असणाऱ्या नाण्यांबरोबर पहिल्यांदाच २० रुपयाचे नाणे चलनात येणार असल्याची माहिती सीतारमन यांनी संसदेमध्ये दिली.
‘लवकरच नवीन नाणी चलनात येणार आहेत. यामध्ये १ रुपया, २ रुपये, ५ रुपये, १० रुपयांच्या नाण्याबरोबरच २० रुपयाचे नाणेही चलनात येणार आहे,’ असं सितारमन यांनी सांगितले. ‘ही नवीन नाणी अंधांना ओळखता येतील अशाप्रकारचे त्यांची निर्मिती केली जाणार आहे’ असंही सितारमन यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच वर्षी ७ मार्च रोजी या नव्या नाण्यांचे अनावरण केले. अंध आणि दिव्यांगांना ही नाणी ओळखता यावी म्हणून नाण्यांच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले असून त्यामुळे त्यांना ही नाणी ओळखणे अधिक सोपे जाणार आहे.
Delhi: Prime Minister Narendra Modi releases visually-challenged friendly new series circulation coins of different denominations pic.twitter.com/0F6jjlpkHd
— ANI (@ANI) March 7, 2019
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी सरकारने चलनातील ५०० तसेच १००० रुपयांच्या नोटा हद्दपार केला. काळ्या पैश्याविरोधात कारवाई म्हणून हा निर्णय घेतल्याचे सरकारने जाहीर केले होते. नोटबंदीच्या निर्णयानंतर बाराजामध्ये ५०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणण्यात आल्या. त्यापाठोपाठ २०१७ साली ५० रुपयांच्या आणि १०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणण्यात आल्या. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये दहा रुपयांच्या नवीन नोटा चलानात आणण्यात आल्या. त्याचप्रमाणे लवकरच २० रुपयांच्या नवीन नोटा मोठ्या प्रमाणात नोटा चलनात आणणार असल्याचे आरबीआयने जाहीर केले आहे. याच घोषणेपाठोपाठ आता अर्थमंत्र्यांनी नवीन नाणी बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. २०१९ पासून १० रुपयांची नाणीही चलनात आणण्यात आली असून १ रुपये तसेच २ रुपये मुल्याच्या नाणी मागील काही वर्षांमध्येच नव्याने चलनात आणण्यात आली आहेत.
असे असेल २० रुपयांचे नाणे
२० रुपयांच्या नाण्यासंदर्भात मार्च महिन्यामध्ये अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार हे नाणे अनेक अर्थांनी वेगळे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
> २० रुपयांच्या नाण्याचे वजन ८.५४ ग्रॅम असेल.
> नाण्याचा आकार २७ एमएम एवढा असणार
> नाण्याच्या बाहेरच्या रिंगमध्ये ६५ टक्के तांबे, २० टक्के निकेल आणि १५ टक्के जस्त असणार आहे
> १२ किनार असणाऱ्या या नाण्यांच्या काठांवर कोणत्याही प्रकारची डिझाईन नसणार
> नाण्याच्या पुढील बाजूला अशोक स्तंभाचे निशाण असेल आणि त्याखाली ‘सत्यमेव जयते’ लिहिलेले असणार आहे
> नाण्याच्या मागील बाजूला २० रुपये असा उल्लेख असेल आणि त्यावर रुपयाचे चिन्ह असणार आहे. यासह शेतीप्रधान देशाचे चिन्ह म्हणून धान्याचे चित्रही असणार आहे.