मुंबई : शालेय आणि उच्च शिक्षणासाठी अर्थसंकल्पातील तरतुदी या सुरू केलेल्या योजनांचा पुढील टप्पा अशाच स्वरूपाच्या आहेत. मात्र, कृत्रिम प्रज्ञेच्या शैक्षणिक वापरासाठी मात्र भरीव तरतूद करण्यात आली आहे. ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय फॉर एज्युकेशन’ची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून आरोग्य, शेती आणि शाश्वत विकास यांवरील संशोधनासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची तरतूद करण्यात आली होती. आता शिक्षणासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर आणि त्यावरील अभ्यासासाठी तरतूद करण्यात आली आहे.
‘आयआयटी’ची क्षमता वाढवणार
‘आयआयटीं’साठी गेल्या वर्षी करण्यात आलेली १० हजार ४६७ कोटींची तरतूद वाढवून २०२५-२६साठी ती ११ हजार ३४९ कोटी करण्यात आली आहे. देशातील २०१४ नंतर स्थापन झालेल्या पाच ‘आयआयटी’ची प्रवेश क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार ‘आयआयटी’तील एकूण ६५०० जागा वाढणार आहेत. गेल्या १० वर्षांमध्ये देशातील २३ ‘आयआयटीं’मधील विद्यार्थ्यांची संख्या ६५ हजारांवरून १ लाख ३५ हजारापर्यंत वाढली आहे. असे सीतारामन यांनी भाषणात सांगितले.वैद्याकीय अभ्यासक्रमाच्या १० हजार जागांत वाढ येत्या आर्थिक वर्षांत वैद्याकीय अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता १० हजारांनी वाढवण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या पाच वर्षांत ७५ हजार जागा वाढतील.
●शालेय शिक्षणात पुढील पाच वर्षांत ५० हजार ‘अटल टिंकरिंग लॅब’ स्थापन करण्याचे उद्दिष्ट
●भारतनेट योजनेअंतर्गत देशातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये इंटरनेट जोडणी, सक्षम अंगणवाडी प्रकल्पाचे दुसरे पर्व, शालेय आणि उच्च शिक्षणातील पुस्तके भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देणे यासाठी तरतूद
●कौशल्य विकासासाठी पाच ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’ची घोषणा