केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सातीरामन यांनी आज वर्ष २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी संरक्षण क्षेत्रासाठी ४.७८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत डिफेन्स बजेटमध्ये सात हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मागच्यावर्षी संरक्षणासाठी ४.७१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
४.७८ लाख कोटीच्या बजेटमध्ये १.३५ लाख कोटी रुपये शस्त्रास्त्र खरेदीसाठी राखून ठेवण्यात येतील. मागच्यावर्षी भांडवली खर्च म्हणजे शस्त्रास्त्र खरेदीसाठी १.१३ लाख कोटी रुपये खर्च झाला. त्यात १९ टक्के वाढ करण्यात आली आहे. पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबरचा संघर्ष आणि चीन-पाकिस्तानकडून असलेला युद्धाचा धोका त्या पार्श्वभूमीवर संरक्षणाच्या बजेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.
आणखी वाचा- करोना लसीकरणासंदर्भात निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली मोठी घोषणा
यंदा महसूली खर्चासाठी २.१२ लाख कोटी रुपये तर पेन्शनसाठी १.१५ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागच्यावर्षी डिफेन्स बजेट ४.७१ लाख कोटी रुपये होते. तेच २०१९-२० मध्ये संरक्षणासाठी ४.३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. डिफेन्स बजेटमध्ये वाढ करण्याचं मोदी सरकारचं हे सलग सातव वर्ष आहे.