हरियाणा राज्यातील रेवाडी जिल्ह्यात एका श्वानाला त्याच्या इमानदारीची मोठी किंमत मोजावी लागली आरहे. या श्वानाला त्याच्या मालकाप्रती असलेल्या इमानदारीच्या बदल्यात आपला जीव गमवावा लागला आहे. रेवाडीतल्या छव्वा या गावातली ही घटना आहे. येथील एक तरुण त्याच्याकडील पिटबुल जातीच्या श्वानाला बाहेर फिरायला घेऊन गेला. वाटेत एका म्हशीने त्या तरुणावर हल्ला केला. म्हशीने तरुणाला आपलं शिंग मारलं. आपल्या मालकावरील हा हल्ला पिटबुल सहन करू शकला नाही. त्यामुळे या श्वानाने म्हशीची शेपटी आपल्या जबड्यात पकडली. त्यामुळे म्हशीच्या मालकिनीने त्या श्वानावर काठीने हल्ला केला.
म्हशीची मालकीन आणि तिच्या शेजाऱ्याने मिळून श्वानाला मरेपर्यंत मारलं, असा आरोप श्वानाच्या मालकाने केला आहे. श्वानाच्या मालकाने याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आता या घटनेचा तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाची माहिती देताना श्वानाचे मालक सोमवीर यांनी सांगितलं की, ते त्यांच्या श्वानाला फिरायला घेऊन जात होते. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला बांधलेल्या म्हशीने त्यांना शिंगाने टक्कर दिली. त्यामुळे श्वानाने म्हशीची शेपटी जबड्यात पकडली. त्याचवेळी म्हशीचा मालक दीपक यांच्या सुनेने श्वानाला काठीने मारायला सुरुवात केली. तेव्हा श्वानाने म्हशीची शेपटी सोडली. त्याचवेळी त्यांचा शेजारी शिवपाल काठी घेऊन आला आणि त्याने देखील श्वानाला मारायला सुरुवात केली.
हे ही वाचा >> गर्लफ्रेंडला कारमध्ये बसवलं, निर्जन स्थळी नेलं आणि ५० लाखांची मर्सिडीज पेटवली
“श्वानाला मरेपर्यंत मारत राहिले”
सोमवीर म्हणाले की, त्यांनी या दोघांना विरोध केला. परंतु त्यांनी मला मारण्याची धमकी देत मला धक्का दिला. सोमवीर यांनी आरोप केला आहे की, दोघांनी त्यांच्या श्वानाला मरेपर्यंत मारलं. श्वानाचा तिथेच मृत्यू झाला. सोमवीर यांनी पोलिसात यासंदर्भात तक्रार केली आहे. तसेच श्वानाच्या मृतदेहाचा पंचनामा देखील केला आहे. तसेच पोलिसांनी सोमवीर यांची तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे.