Delhi Mustafabad Building Collapse: दिल्लीच्या मुस्तफाबाद परिसरात शनिवारी रात्री एक इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफ आणि दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्त संदीप लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.
अग्निशामक दलाचे अधिकारी राजेंद्र अठवाल यांनी सांगितले की, आम्हाला रात्री २.५० वाजता इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. आमचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाल्याचे दिसले. ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर आम्ही तात्काळ बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफ, दिल्ली पोलीस आणि इतर शासकीय यंत्रणा बचाव कार्यात सहकार्य करत आहेत.
स्थानिकांनी काय सांगितले?
स्थानिकांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, चार मजल्याच्या इमारतीमध्ये चार ते पाच कुटुंबे राहत होते. इमारताच्या मालकाच्या कुटुंबाव्यतिरिक्त इतर भाडेकरू होते. इमारत कोसळल्यानंतर अद्याप चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
दिल्लीतील हवामानात वेगाने बदल
शुक्रवार पासून दिल्लीतील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे पडझड होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. तसेच मधु विहार परिसरात एक निर्माणाधीन इमारत कोसळली.