पीटीआय, नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळच्या एका इमारतीला शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत २६ जणांचा मृत्यू झाला, तर १२ हून अधिक जखमी झाले. मृतांची संख्या वाढण्याची भीती दिल्ली अग्निशमन विभागाने व्यक्त केली. 

आगीने वेढलेल्या या इमारतीतून सुमारे ७० लोकांची सुटका करण्यात आली असली तरी आणखी काही लोक अडकले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. ही आग भीषण असून आतापर्यंत, आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरून २६ मृतदेह बाहेर काढले आहेत. सर्व मृतदेह ओळखण्यापलिकडे आहेत, असे दिल्ली अग्निशमन विभागाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले. 

दिल्ली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंडका स्थानकाजवळच्या या व्यावसायिक संकुलाच्या तीन मजली इमारतीला संध्याकाळी ४.४० च्या सुमारास आग लागली. सीसीटीव्ही कॅमेरे आणि राऊटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्रथम आगीचा भडका उडाला. त्यानंतर ती दुसऱ्या मजल्यावर पसरली. आग विझवण्यासाठी २७ बंब प्रयत्नांची शर्थ करीत होते, अशी माहिती दिल्ली अग्निशमन सेवेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आगीत २० जणांचा होरपळून किंवा गुदमरून मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त समीर शर्मा यांनी दिली.

Story img Loader