Bulandshahr Cylinder Blast Updates : उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदराबादमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. सिकंदराबादमधील एका कॉलनीत सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच या घटनेत ३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतकंच नाही तर या सिलिंडरच्या स्फोटामध्ये दोन मजली घर देखील कोसळलं आहे. घर कोसळल्यामुळे घराच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री ८.३० ते ९ वाजताच्या दरम्यान सिकंदराबाद परिसरात घडली. या घटनेत एक महिला आणि दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, बुलंदशहरमधील सिकंदराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वसाहतीमध्ये ही घटना घडली. या घटनेबाबतची माहिती मेरठ झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ध्रुव कांत ठाकू यांनी दिली. सिलिंडरच्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली असून मदतकार्य सुरु असल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालक ध्रुव कांत ठाकू यांनी सांगितलं.

हेही वाचा : Women Kills Husband : धक्कादायक! पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास धरला अन् उपवास सोडताच पतीची केली हत्या; नेमकं काय घडलं?

या घटनेबाबत बुलंदशहरचे जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी सांगितलं की, सिलिंडरचा स्फोट झाला त्यावेळी घरामध्ये १८ ते १९ लोक उपस्थित होते. यामधील ८ जणांना वाचवण्यात यश आलं. तर काहीजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे, असं जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी सांगितलं.

सिलिंडरचा स्फोट अन् दुमजली घर कोसळले

बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदराबादमधील एका कॉलनीत सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण दोन मजली घर देखील कोसळलं आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. या घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील दखल घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे.

एनडीआरएफकडून बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. ढिगारा हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाकडूनही बचावकार्य करण्यात येत असून एनडीआरएफ-एसडीआरएफ जवानांसह स्थानिक पोलीस प्रशासकीय अधिकारी आणि महापालिकेची टीम बचावकार्य करत आहे. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bulandshahr cylinder blast news 5 people were killed in a cylinder blast in secunderabad in bulandshahr district gkt