उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात गोहत्येच्या संशयावरून उसळलेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सुबोधकुमार सिंह यांच्या बहिणीने त्यांना शहीद घोषित करण्याची मागणी केली असून अखलाक मृत्यू प्रकरणाचा तपास केल्यामुळेच सुबोधकुमार यांची हत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली.

माझ्या भावाने अखलाक हत्येप्रकरणाचा तपास केला आहे. त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आली आहे. हा पोलिसांचाच कट आहे. माझ्या भावाला शहीद घोषित करावे आणि त्याचे स्मारक उभारावे. आम्हाला पैसा नकोय, मुख्यमंत्री नेहमी केवळ गाय-गाय करत राहतात, अशी टीका त्यांनी केली.

याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात सुमारे ९० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलंदशहरामध्ये गेले तीन दिवस एक धार्मिक कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर गोहत्या झाल्याची माहिती नागरिकांना मिळाली. यानंतर परिसरात हिंसाचार सुरु झाला. महाव खेड्याच्या परिसरात हिंसक जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. अनेक वाहने पेटवून दिली. एका पोलीस चौकीला आग लावली. या हिंसाचारात स्याना पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास जमावाने अडथळे आणल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर हा हिंसाचार पाहत असलेला एक तरुण गोळीबारात ठार झाला.

दादरी हत्याकांडाचा केला तपास
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील दादरी येथे २०१५ साली महंमद अखलाक याची गोमांस बाळगल्याच्या संशयातून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुबोध कुमार सिंह यांच्याकडेच होता. सप्टेंबर २०१८ ते ९ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत ते या गुन्ह्याचे तपास अधिकारी होते, अशी माहिती उत्तर प्रदेशमधील मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी दिली. दादरी हत्याकांडाच्या वेळी सुबोध हे नोएडातील जारचा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आरोपींच्या अटकेसाठी सुबोध कुमार यांनी कठोर भूमिकाही घेतली होती. काही महिन्यांमध्येच त्यांची वाराणसीत बदली झाली. २०१६ साली पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्रही दाखल केले. अद्याप या प्रकरणातील १८ आरोपींना शिक्षा झालेली नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

Story img Loader