उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात सुमारे ९० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलंदशहरामध्ये गेले तीन दिवस एक धार्मिक कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर गोहत्या झाल्याची माहिती नागरिकांना मिळाली. यानंतर परिसरात हिंसाचार सुरु झाला. महाव खेड्याच्या परिसरात हिंसक जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. अनेक वाहने पेटवून दिली. एका पोलीस चौकीला आग लावली. या हिंसाचारात स्याना पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास जमावाने अडथळे आणल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर हा हिंसाचार पाहत असलेला एक तरुण गोळीबारात ठार झाला.

बुलंदशहरमधील हिंसाचारावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील पहिला गुन्हा गोहत्या आणि दुसरा गुन्हा हिंसाचारा प्रकरणी दाखल झाला आहे. यातील हिंसाचाराप्रकरणी एकूण ८७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात २७ आरोपींची नावे देण्यात आली असून ६० आरोपी अजूनही अज्ञात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुबोध कुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader