देशात बुलेट ट्रेन धावणार हे स्वप्न राहणार नसून लवकरच सत्यात उतरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने या प्रकल्पामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन मात करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठीच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया वेगात सुरु असून यासाठी काढण्यात येणाऱ्या पहिल्या निविदेची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. येत्या ३ ऑगस्ट रोजी ही निविदा उघडण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी लोकसभेत लिखीत स्वरुपात बुधवारी ही माहिती दिली. जनसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.
या प्रकल्पासाठीची पहिली निविदा २१० मीटर लांबीच्या खास पुलाची आहे. हा पुल बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या ५९ पुलांपैकी एक आहे. हा प्री-स्ट्रेस्ट बॅलन्स पुल गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ४८ वर उभारण्यात येणार आहे. २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र, त्यापूर्वी एक वर्ष आधीच हा प्रकल्प पूर्ण करुन ट्रेन धावेल असेही पीयुष गोयल यांनी सांगितले आहे.
बुलेट ट्रेनच्या या मुंबई हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण २६ निविदांचे पॅकेज तयार आहे. यांपैकी ६ निविदा बोलावण्यात आल्या आहेत. यांपैकी जी निविदा ३ ऑगस्ट रोजी खोलण्यात येणार आहे ती मुंबईच्या दिशेने असणाऱ्या पुल क्रमांक दहाबाबत असणार आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी २०१८च्या शेवटापर्यंत जमीन अधिग्रणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर जानेवारी २०१९पासून प्रकल्पाच्या कामाला वेगाने सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या सुत्रांनी दिली आहे.
बुलेट ट्रेन कॉरिडॉरची लांबी ५०८ किमी आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून ११० किमीच्या भागातून हा मार्ग जाणार आहे. या प्रकल्पातील जमीन अधिग्रहणातच १० हजार कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. जमीन अधिग्रहणाच्या बदल्यात शेतकऱ्यांना पाच पट अधिक नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
या मार्गावर एकूण १२ स्थानके असणार आहेत. यांपैकी ८ स्थानके गुजरातमध्ये तर ४ स्थानके महाराष्ट्रात असणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी १ लाख १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी ०.१ टक्के व्याजदराने ५० वर्षांसाठी जपानकडून कर्ज मिळाले आहे. यासाठी १५ वर्षांपर्यंत व्याज फेडायचे नाही.